संयुक्त अरब अमिरातीच्या (यूएई) एकोणीस वर्षांखालील महिला क्रिकेट संघाने नेपाळच्या संघाचा अवघ्या आठ धावांवर गुंडाळण्याची किमया करून दाखवली. मलेशियामध्ये सुरू असलेल्या एकोणीस वर्षांखालील महिला क्रिकेट विश्वचषकाच्या पात्रता सामन्यांमध्ये यूएईने ही कामगिरी केली. मिळालेल्या आठ धावांचे लक्ष्य अवध्या १.१ षटकांत म्हणजे सात चेंडूतच पूर्ण करून सर्वात झटपट विजय नोंदवला.
यूएईची वेगवान गोलंदाज माहिका गौरने नेपाळच्या फलंदाजीची अक्षरश: धुळदाण उडवून टाकली. तीने दोन षटके गोलंदांजी करत पाच बळी मिळवले. त्यानंतर, विजयासाठी मिळालेल्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या यूएईची कर्णधार तीर्था सतीश (४) आणि सलामीवीर लावन्या (३) यांनी सहज आपल्या संघाला विजय मिळवून दिला.
त्यापूर्वी, नेपाळने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. परंतु, नेपाळच्या मुली खेळपट्टीवर फार काळ टिकू शकल्या नाहीत. त्यांचे सहा फलंदाज संघाची धावसंख्या शून्य असतानाच बाद झाले. त्यानंतर आलेल्या स्नेहा महारा आणि मनीषा राणा यांनी अनुक्रमे ३ आणि २ धावा केल्या. तर, किरण कुमारी कुंवर, अनु कडायत आणि अश्मा पुलमी मगर यांनी प्रत्येकी एक धाव जोडली.
एकोणीस वर्षांखालील महिला टी ट्वेंटी विश्वचषक पात्रता फेरीला मलेशियामध्ये खेळवली जात आहे. यामध्ये नेपाळ, यूएई, थायलंड, भूतान आणि कतार हे संघ सहभागी झालेले आहेत. पात्रता फेरीतील विजेत्याला २०२३ च्या सुरुवातीला दक्षिण आफ्रिकेमध्ये होणाऱ्या पहिल्यावहिल्या स्पर्धेत स्थान मिळवण्याची संधी आहे.