कोयना धरणामुळे उचाट गावाचे ठाणे जिल्ह्य़ामधील वाडा तालुक्यात पुनर्वसन झाले. याच गावातील तरुण उचाट मंडळ कबड्डीच्या क्षितिजावर तेजाने तळपतो आहे. ‘प्रो-कबड्डी लीग’मध्ये पुणे पलटण संघाकडून खेळणारा आणि नितीन मोरे याच गावचा. घरची परिस्थिती तशी बेताचीच. शेतीवरच उदरनिर्वाह करीत त्याच्या वडिलांनी कुटुंबाची गुजराण केली. त्यांच्या सहा मुलांपैकी नितीन हे शेंडेफळ. बालपणीपासूनच नितीनला खेळाची विलक्षण आवड. या खेळानेच आज नितीनला भारत पेट्रोलियममध्ये चांगली नोकरी दिली आहे.
‘‘शालेय दिवसांमध्ये मी कबड्डीप्रमाणेच खो-खोसुद्धा खेळायचो. खो-खोमध्ये मी राष्ट्रीय शालेय पातळीपर्यंत खेळलो. बारावीपर्यंत मी उचाट गावातच शिकलो. आमच्या महाविद्यालयाचा संघ महर्षी दयानंद करंडक स्पध्रेत खेळायचा. तिथे आमची कामगिरी अतिशय चांगली झाली, परंतु अंतिम सामन्यात हरलो. मात्र राजेश पाडावे या प्रशिक्षकाने माझ्यातील गुणवत्ता हेरून मला महर्षी दयानंद महाविद्यालयाकडूनच कबड्डी खेळत शिक्षण घेण्याचे सुचवले. मग १३वीपासून मी महर्षी दयानंदमध्ये खेळायला लागलो. तसेच अनिल मोरे उचाट गावात कबड्डी शिकवायचे. त्यांनीच मला कबड्डी खेळायला शिकवले आणि मुंबई बंदरमध्ये कंत्राटी तत्त्वावर नोकरीला लावले. त्यामुळे मुंबईतील व्यावसायिक कबड्डीचे मला बाळकडू मिळाले,’’ अशा शब्दांत नितीनने कबड्डीचा आपला प्रवास उलगडला.
‘‘परेलला बहिणीकडे राहून मी शिक्षण घेतले. कबड्डीने माझ्या आयुष्याला सुखसमृद्धी दिली. काही वर्षांपूर्वी नवी मुंबईत नेरुळला घर घेतले आहे. यासाठी मी गृहकर्ज घेतले आहे. प्रो-कबड्डीच्या लिलावातून मला मिळालेल्या पैशाद्वारे या घराचे कर्ज
फेडण्यास मला मोठी मदत होईल,’’ असे त्याने पुढे सांगितले.
नितीन आजही कबड्डीचे ऋण फेडण्यासाठी आपल्या उचाट गावी जातो आणि उदयोन्मुख खेळाडूंना खेळाचे धडे देतो. याविषयी तो म्हणतो, ‘‘मला कबड्डीद्वारे नोकरी मिळाली आहे. थोडे बरे दिवस आले आहेत. त्यामुळे माझ्या खेळासाठी आणि गावातील खेळाडूंसाठी जे काही करता येईल, ते करतो. शनिवार-रविवारी मी आणि मुंबईत नोकरीला असलेले आमच्या संघातील बरेच जण गावाकडे जातो.’’
शनिवारपासून सुरू होणाऱ्या प्रो कबड्डी लीगच्या तयारीविषयी नितीन म्हणाला, ‘‘दिवस-रात्र आमची मेहनतीने तयारी चालू आहे. शारीरिक तंदुरुस्तीप्रमाणेच मातीवर आणि मॅटवर आमचा कसून सराव सुरू आहे. रामपाल कौशिक यांच्या मार्गदर्शनाखाली मैदानी सरावावर आमचा विशेष भर असतो.’’
‘‘सध्या नवी पिढी फुटबॉल, क्रिकेटकडे वळू लागली होती; परंतु कबड्डी टीव्हीवर दिसेल तेव्हा या खेळाची लोकप्रियता वाढेल. हा खेळ फक्त ताकदीवर चालत नाही, चापल्य आणि मनाचे सामथ्र्यसुद्धा महत्त्वाचे असते. आता कबड्डीपटूंना चांगल्या नोकऱ्यासुद्धा लागू लागल्या आहेत, हे महत्त्व सर्वाना पटेल,’’ असा आशावाद नितीनने या वेळी
प्रकट केला.
उचाट गावातील नितीनची अचाट कथा!
कोयना धरणामुळे उचाट गावाचे ठाणे जिल्ह्य़ामधील वाडा तालुक्यात पुनर्वसन झाले. याच गावातील तरुण उचाट मंडळ कबड्डीच्या क्षितिजावर तेजाने तळपतो आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 24-07-2014 at 06:10 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Uchat village nitins exciting story