|| वि. वि. करमरकर
मल्लखांब प्रशिक्षक उदय देशपांडे यांना रविवारी गेट वे ऑफ इंडियावर महाराष्ट्र शासनाकडून शिवछत्रपती जीवनगौरव पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे. या निमित्ताने एका ज्येष्ठ क्रीडा पत्रकाराने व्यक्त केलेली ही अस्वस्थता.
राज्याचे क्रीडामंत्री विनोद तावडे यांची कर्तबगारी नेमकी कशाकशांत? महाराष्ट्र शासनाचे जीवनगौरव आदी छत्रपती पुरस्कार निश्चित करण्यासाठी, यशवंत खेळाडूंची खास निवड समिती त्यांनी बनविली. पण त्यांची निवड त्यांना रुचेना. पण पराभव मान्य करतील, तर ते विनोदजी कसले? त्यांनी घेतली माघार; लक्षात ठेवा, ‘यशस्वी’ माघार! या वाट चुकलेल्या निवड समितीस आणि हलक्या आवाजात त्यांनी विनम्र वृत्तीनं स्मरण करून दिलं की : समितीच्या निवडीत फेरबदल करण्याचा अधिकार शासनास असतो! मग विनोदजींनी आपणच नेमलेल्या निवड समितीची निवड गुंडाळली असेल.
अनुभवांतून विनोदजी बरंच काही शिकले. त्यांनी उदय देशपांडे यांचा जीवनगौरव समारंभ (एकदाचा!) पार पडल्यानंतर किमान तीन-चार आठवडय़ांत, जीवनगौरव उमेदवारांनी आणि त्यांच्यातर्फे सादर झालेल्या त्यांच्या कार्याचा तपशील ऊर्फ स्वपरिचयपत्र, पत्रकारांच्या वा कुणाच्याही हाती लागू द्यावयाचा नाही, असा चंग त्यांनी बांधला. सालाबादप्रमाणे निवड समिती सदस्यांना गोपनीयतेची शपथ घ्यायला लावली. या गनिमी काव्याचे वैशिष्टय़, वा व्यवच्छेदात्मक लक्षण म्हणजे, ‘ जप करायचा अर्थातच पारदर्शकतेचा; अन् आचरणात आणायची गुप्तता’- हेच म्हणावे लागेल.
आता यंदाचंच उदाहरण बघा. जीवनगौरव पुरस्कार जाहीर केला गेला, बुधवारी १३ फेब्रुवारीला दुपारी. अन् त्याचं वितरण त्यानंतर चौथ्या दिवशी, रविवारी संध्याकाळी, वाजतगाजत गेटवेवर! आता कोणी नतद्रष्ट माहिती अधिकार (आरटीआय) वापरू पाहात असेल, तर त्याचं उत्तर देण्यात तीन आठवडय़ांचा अवधी नियमात बसणारा. मग त्यानं चलन काढायचं. त्यात आणखी काही दिवस जाणार! तोपर्यंत वितरण समारंभास महिना लोटलेला असणार.
आता उदय देशपांडेंच्या जीवनगौरव कर्तृत्वाबद्दल. त्यांनी वा त्यांच्यातर्फे दिलेल्या माहितीत काय काय दावे केले आहेत, हे मलाच काय, पण विनोदजी आणि निवड समिती यांखेरीज, म्हणजे सुमारे बारा कोटी मराठी माणसं उणे विनोदजींच्या गोटातील १०-१५ साथीदार, याखेरीज कुणालाच माहिती नाही. म्हणून काही गोष्टी नम्रपणे नमूद करतो. त्यांच्या ‘कार्याची’ चौकट फक्त शिवाजी पार्क, हे कटुसत्य प्रथम समजावून घेऊ या.
काही दशकांपूर्वी उदय देशपांडे यांच्यावर एका तरुण विद्यार्थिनीशी गैरवर्तन केल्याच्या आरोपांनी, शिवाजी पार्कवर अक्षरश: वणवा पेटला होता. तेव्हा देशपांडेंना मध्यरात्रीनंतर खूप मारहाणही झाली होती. त्या मारहाणीचा निषेध करणाऱ्यांत मृणाल गोरे, हशू अडवाणी, अहिल्या रांगणेकर, प्रभृतींसह माझ्यासारखे क्रीडा पत्रकारही होते. पण हा निषेध मारहाण करण्याच्या प्रकाराचा होता, मारहाणीपर्यंत वेळ येण्यामागच्या कारणाचा नव्हता. देशपांडे यांची कार्यपद्धती आम्हाला मंजूर नव्हती.
समर्थ व्यायाम मंदिराने बुजुर्गाची चौकशी समिती नेमली. अशा प्रकरणी पुरावे कोणते मिळणार? देशपांडे यांना समितीनं कडक समज दिली. यापुढे देशपांडेंनी महिलांना मल्लखांब इ. शिकवणं बंद करावं, अन् ती जबाबदारी महिला प्रशिक्षकांवर सोपवावी. देशपांडे महिलांना बंदिस्त हॉलमध्ये नेताना, दरवाजे आणि खिडक्या आतून बंद करून घेत असत. ती प्रथाही बदलण्याचे आदेश चौकशी समितीने दिले होते!
देशपांडेंना अतितरुणपणी, तेव्हाचे क्रीडामंत्री अरुण दिवेकर यांनी संघटक / कार्यकर्ता पुरस्कार दिला. तेव्हा कल्याणपूरकरांना डावलले म्हणून निदर्शने झाली होती. एका पुरस्कारात समाधान मानणाऱ्यांतले देशपांडे नाहीत. त्यांनी मार्गदर्शक पुरस्कारासाठी मोहीम काढली. ‘त्यासाठी त्यांनी दाखवलेले शिष्य त्यांचे की श्रेयस म्हसकर यांचे?’ याविषयी जाणकारांनाच विचारावे. येथे हेही नमूद केलंच पाहिजे की; देशपांडे यांना शिवाजी पार्क मैदानात मारहाण झाली, तेव्हा त्यांच्या अंगावर स्वत:ला ढालीसारखे झोकून देणारे आणि फटके हसतमुखपणे सोसणारे तर श्रेयस म्हसकरच होते! पण निर्दयपणे देशपांडेंनी दादोजी कोंडदेव पुरस्कारही लाटला!
सरतेशेवटी देशपांडेंच्या मल्लखांब प्रसार-प्रचाराबाबत. महाराष्ट्रात जागोजागी गेली ही ५० वर्षे मल्लखांब जोपासनेची परंपरा आहे. पुण्यात शिवरामपंत दामलेंचे ‘महाराष्ट्रीय मंडळ’ आणि ‘सन्मित्र’ इत्यादी. मिरजेला करमरकर कुटुंबियांची ‘अंबाबाई तालीम’ आणि ‘भानू तालीम’. सांगलीत गोटखिंडेंचे तरुण भारत आणि राजा स्वामींची संस्था. इस्लामपूरला चंद्रकांत पाटील, कोल्हापूरला हिरेमठ आणि आरोसकर. नाशिकला महाबळांची ‘यशवंत व्यायामशाळा’, पंचवटीतील ‘तरुण ऐक्य मंडळ’ आणि गुलालवाडी, अमरावतीत हनुमान प्रसारक मंडळ, चेंबूरला पंत, पाठारे, चेंबूरकर यांचे प्रबोधन. गोरेगावला प्रबोधन, लीलाधर हेगडेंची साने गुरुजी शाळा, याखेरीज चेंबूर, पार्ले, वांद्रे, पोयसर, बोरिवली, दहिसर, मुलुंड आदी उपनगरांतील ३० संस्था. ठाण्यातील संस्था वेगळ्याच. यांच्या उभारणीशी देशपांडे यांचा काडीचाही संबंध नाही. काही दशके सत्ता गाजवल्यानंतर सत्तेबाहेर फेकले गेलेले देशपांडे अलीकडे पर्यटकाच्या रूपात प्रचारक आहेत. हेही महाराष्ट्रावर त्यांचे उपकार. विनोदजी, महाराष्ट्राबाहेर फेकल्या गेलेल्या देशपांडेंचे आभार महाराष्ट्र मानत आहे!