सलामीच्या लढतीत गुजरात जायंट्सकडून पराभव; तेलुगु योद्धाजही विजयी

ज्ञानेश भुरे, लोकसत्ता

पुणे : भारताच्या पारंपरिक खेळाला नवे स्वरुप देणाऱ्या अल्टिमेट खो-खो लीग स्पर्धेमध्ये रविवारी झालेल्या सलामीच्या सामन्यांत गुजरात जायंट्स आणि तेलुगु योद्धाज या संघांनी धारदार आक्रमणाच्या जोरावर शानदार विजयांची नोंद केली. गुजरातने मुंबई खिलाडीजचा ६९-४४ असा, तर तेलुगुने चेन्नई क्वीक गन्सचा ४८-३८ असा पराभव केला.

म्हाळुंगे बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलाच्या बॅडिमटन हॉलमध्ये सुरू झालेल्या या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, लीगचे मुख्य कार्यकारी अधिकारी तेिन्झग नियोगी, भारतीय खो-खो महासंघाचे अध्यक्ष सुधांशु मित्तल आणि सचिव एम. एस. त्यागी यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. त्यानंतर सामन्यांना प्रारंभ झाला. 

पाठलाग आणि आक्रमणाच्या या खेळात मुंबईविरुद्ध गुजरातने मध्यंतराला २६-२४ अशी आघाडी घेतली होती. बचावात कमी पडलेल्या गुजरातच्या खेळाडूंनी आक्रमणात ती उणीव भरुन काढली. पोलवर गडी मारण्याचे गुजरातच्या खेळाडूंचे तंत्र विशेष ठरले.

गुजरातच्या आक्रमणाची जबाबदारी अनिकेत पोटेने समर्थपणे पेलली. त्याला बचावात विनायक पाकरडे आणि मरिअप्पाची साथ मिळाली. मुंबईकडून कर्णधार विजय हजारे, रोहन कोरेचा बचाव आणि श्रीजेशचे आक्रमण वगळता अन्य खेळाडूंना छाप पाडता आली नाही.

दुसऱ्या सामन्यात पुन्हा एकदा आक्रमणच भारी पडले. प्रतिक वाईकर, आदर्श मोहिते, रोहन शिंगाडे, अरुण गुनकी यांच्या धारदार आक्रमणाने तेलुगु संघाने चेन्नईविरुद्ध विश्रांतीलाच त्यांनी २९-१५ अशी आघाडी मिळविली. त्यानंतर चेन्नईला पुनरागमन करणे शक्य झाले नाही.

Story img Loader