पाकिस्तानी फलंदाज उमर अकमल याला वाहतूक अधिका-याला मारहाण केल्याप्रकरणी संपूर्ण दिवस तुरुंगात काढावा लागला आहे. वाहतूकीच्या सिग्नलचे उल्लंघन केल्यानंतर थांबवण्यात आल्यावर संतापलेल्या उमर अकमलने संबधित वाहतूक अधिका-याला मारहाण केली. त्यानंतर त्याचे कपडेही फाडले होते. या घटनेनंतर गुलबर्ग पोलिसांनी उमर अकमलविरूद्ध तीन गुन्हे करून त्याला अटक केली होती. मात्र, त्यानंतर त्याची वैयक्तिक जातमुचलक्यावर सुटका करण्यात आली.
त्याची सुटका करण्यात आली असली तरी सोमवारी चालवण्यात येणा-या खटल्यासाठी त्याला मॅजिस्ट्रेटसमोर हजर व्हावे लागणार असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. उमर अकमलला अटक झाल्यानंतर त्याच्या काही समर्थकांनी पोलीस ठाण्याबाहेर जमून त्याच्या अटकेच्या निषेधार्थ नारेबाजी केली होती. देशाच्या संघाचा भाग असणा-या खेळाडूला अशी वागणूक मिळाल्यामुळे आपण नाराज असल्याची प्रतिक्रिया उमरचा मोठा भाऊ कामरान अकमल याने दिली आहे. आम्ही दहशतवादी नसून आम्ही सुद्धा कायद्याचा आदर करतो, असेही तो म्हणाला. परंतु, देशासाठी खेळणा-या खेळाडूला एका सामान्य गुन्हेगाराप्रमाणे वागणूक देणे योग्य नसल्याचे सुद्धा यावेळी कामरान अकमल याने म्हटले आहे.
उमर अकमलची जामिनावर सुटका
पाकिस्तानी फलंदाज उमर अकमल याला वाहतूक अधिका-याला मारहाण केल्याप्रकरणी संपूर्ण दिवस तुरुंगात काढावा लागला आहे.
First published on: 02-02-2014 at 04:10 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Umar akmal released on bail