टी-२० विश्वचषकात भारत आणि पाकिस्तान २४ ऑक्टोबरला आमनेसामने असणार आहेत. पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज उमर गुलच्या मते, विश्वचषकासाठी निवडलेल्या पाकिस्तानी संघावर टीका होऊ नये. गुलच्या मते, न्यूझीलंड आणि इंग्लंड दौरे रद्द झाल्यानंतर देशाच्या क्रिकेटविषयी नकारात्मकता लक्षात घेऊन पाकिस्तानच्या क्रिकेटपटूंना प्रोत्साहन देण्याची गरज आहे.
४०० पेक्षा जास्त आंतरराष्ट्रीय विकेट घेणारा ३७ वर्षीय गुल म्हणाला, “टी २० विश्वचषक संघ घोषित झाल्यापासून बरीच टीका झाली आहे यात शंका नाही. मला वाटते की आपण संघावर टीका केली पाहिजे, पण खेळाडूंच्या नावांचा उल्लेख करू नये कारण न्यूझीलंड आणि इंग्लंडचा पाकिस्तान दौरा रद्द झाल्यानंतर आमचे क्रिकेट कठीण अवस्थेतून जात आहे. खेळाडूंना निराश करण्याऐवजी त्यांचे समर्थन करण्याची वेळ आली आहे.”
उमर गुल म्हणाला, ”क्रिकेटपटूंनीही टीका मनावर घेऊ नये आणि क्षमतेनुसार प्रदर्शन करत राहिले पाहिजे. खेळाडूंनीही दबावाखाली येण्याऐवजी ही टीका सकारात्मकपणे घ्यावी. मी तेच केले. जेव्हा मी माझ्या कारकीर्दीत अशा परिस्थितीचा सामना केला आणि मैदानावरील माझ्या कामगिरीद्वारे माझ्या टीकाकारांना उत्तर देण्याचा प्रयत्न केला. सध्या सुरू असलेला राष्ट्रीय टी-२० चषक ही खेळाडूंना त्यांचा आत्मविश्वास परत मिळवण्याची चांगली संधी आहे.”
हेही वाचा – IPL : आर्यन खाननं ‘या’ खेळाडूला घेतलं होतं KKR संघात, आज तोच गाजवतोय यूएईचं मैदान!
भारताविरुद्धच्या हाय व्होल्टेज सामन्याआधी संघावरील अतिरिक्त दबावाबाबत गुल म्हणाला, “भारताविरुद्धच्या सामन्याचा अतिरिक्त दबाव आहे, कारण संपूर्ण देशाला आपण त्यांना पराभूत करावे असे वाटते. मी सुचवतो, की खेळाडूंनी त्यांचा नैसर्गिक खेळ खेळावा. हा दबावाचा सामना असल्याने खेळाडूंनी त्यांच्यावर दबाव टाकू नये. मी असेही सुचवेन, की दोन ते तीन दिवस आधी, विशेषत: भारताच्या सामन्यादरम्यान, खेळाडूंनी सोशल मीडियापासून लांब राहावे.”