India vs Australia: भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीला करोना विषाणूचा संसर्ग झाला आहे. यामुळे त्याला आगामी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन टी-२० सामन्यांच्या मालिकेतून वगळण्यात आलं आहे. मोहम्मद शमीऐवजी आता वेगवान गोलंदाज उमेश यादवला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत संधी देण्यात आली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने रविवारी (१८ सप्टेंबर) ही घोषणा केली आहे.

मोहाली येथे २० सप्टेंबरपासून भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया तीन टी-२० सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. तत्पूर्वी कोविड-१९ चाचणी केली असता, मोहम्मद शमीची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्यामुळे शमीला विलगीकरणात ठेवण्यात आलं असून उमेश यादवला संधी देण्यात आली आहे.

हेही वाचा- विराट मोहालीत पोहचताच अनुष्का शर्माची भावनिक पोस्ट, म्हणाली “तुझ्या सोबत राहून हे जग खूप सुंदर वाटते…”

खरं तर, पुढील एक महिन्यात टी-२० विश्वकप खेळवला जाणार आहे. याच पार्श्वभूमीवर वेगवान गोलंदाजांची बाजू भक्कम करण्याचा प्रयत्न भारतीय संघाकडून केला जात आहे. त्यासाठी मोहम्मद शमीला आगामी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत संधी देण्यात आली होती. पण करोनाचा संसर्ग झाल्याने त्याला वगळण्यात आलं आहे. दुसरीकडे, नवदीप सैनीदेखील दुखापतग्रस्त झाला असून न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यातून त्यानं माघार घेतली आहे.

हेही वाचा- ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-२० मालिकेआधी भारताला मोठा धक्का; कोविड संसर्गामुळे महत्त्वाचा खेळाडू बाहेर

उमेश यादव दोन वर्षानंतर संघात पुनरागमन करणार आहे. यापूर्वी २०१९ मध्ये तो ऑस्ट्रेलियाविरुद्ध सात टी-२० सामन्यांच्या मालिकेत खेळला होता. दरम्यान, त्याला दुखापत झाल्याने मागील दोन वर्षापासून तो संघाबाहेर होता. अखेर दोन वर्षानंतर उमेश यादव पुनरागमन करण्याची संधी मिळाली आहे.

मोहम्मद शमी दक्षिण आफ्रिकेविरुद्धची टी-२० मालिका सुरू होण्यापूर्वी संघात परतण्याची शक्यता आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धचे तीन टी-२० सामने अनुक्रमे २०, २३ आणि २५ सप्टेंबर रोजी होणार आहेत. त्यानंतर २८ सप्टेंबर पासून भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघात तीन टी-२० सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे.