भारतीय क्रिकेट संघातील वेगवान गोलंदाज उमेश यादव याचा सोमवारी दिल्लीची फॅशन डिझायनर तान्या हिच्याशी साखरपुडा झाला. उमेशने अलीकडेच घेतलेल्या रामदासपेठ भागातील सालासार अपार्टमेंटमधील फ्लॅटमध्ये मोजक्या नातेवाईकांच्या उपस्थितीत दोघांनीही परस्परांना अंगठय़ा घातल्या. त्यांचा विवाह स्वागत समारंभ येत्या २९ मे रोजी सायंकाळी नागपुरातील हॉटेल सेंटर पॉईंटमध्ये होणार आहे. उमेश सध्या आयपीएल स्पर्धेच्या सहाव्या दिल्ली डेअर डेव्हिल्स संघाचे प्रतिनिधीत्व करीत असून साखरपुडय़ासाठी सकाळी नागपुरात आला होता. साखरपुडा समारंभ आटोपल्यानंतर तो सायंकाळी लगेच दिल्लीला विमानाने रवाना झाला. त्याची भावी पत्नी तान्या मूळ दिल्लीचीच रहिवासी असून आई व भावासोबत राहते. तिचा भाऊ उद्योजक आहे. आयपीएलचा समारोप २६ मे रोजी होणार असून त्यानंतर तीनच दिवसांनी उमेश आणि तान्या विवाहबंधनात अडकतील. उमेशने भारतीय संघाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीसह सर्वच खेळाडूंना विवाहाचे निमंत्रण दिले असून त्यांना विवाह समारंभात सहभागी होता यावे, यासाठी २९ मे ही तारीख निश्चित करण्यात आल्याचे उमेशने ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले. उमेश मूळ नागपूरनजीकच्या वलनी खाण परिसरातील रहिवासी असून त्याच परिसरात विवाह सोहळ्याची तयारी सुरू झाली असल्याचे समजते. उमेशने रामदासपेठेतील फ्लॅटची खरेदी आयपीएल स्पर्धा सुरू होण्याच्या काही दिवस आधी केली आणि वास्तूपूजनाला तान्या हजर होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा