IND vs NZ, 2nd ODI Playing XI: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील ३ सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील दुसरा सामना २१ जानेवारी रोजी रायपूर येथे खेळवला जाणार आहे. दोन्ही संघांमधील हा सामना भारतीय वेळेनुसार दुपारी १.३० वाजता सुरू होईल. सध्या ३ सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत टीम इंडिया १-० ने पुढे आहे. दुसरा एकदिवसीय सामना जिंकून भारतीय संघाला मालिका आपल्या नावावर करायची आहे. त्याचबरोबर न्यूझीलंड संघाला हा सामना जिंकून मालिकेत पुनरागमन करायला आवडेल. मात्र, या सामन्यासाठी टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल जवळपास निश्चित मानला जात आहे.
उमरान मलिकचे पुनरागमन निश्चित
रायपूर एकदिवसीय सामन्यात वेगवान गोलंदाज उमरान मलिकचे पुनरागमन निश्चित असल्याचे मानले जात आहे. त्याचवेळी उमरान मलिकचे भारतीय प्लेइंग इलेव्हनमध्ये पुनरागमन झाल्यानंतर शार्दुल ठाकूरला बाहेर बसावे लागू शकते. न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात उमरान मलिक संघाचा भाग नव्हता. तर शार्दुल ठाकूर प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळला होता. शार्दुल ठाकूरने पहिल्या एकदिवसीय सामन्यात २ विकेट्स घेतल्या होत्या. या सामन्यात पालघर एक्सप्रेसने ७.२ षटकात ५४ धावांत २ गडी बाद केले, पण या वेगवान गोलंदाजाला रायपूर वनडेत बाहेर बसावे लागू शकते.
आयसीसीची टीम इंडियावर कारवाई
अत्यंत रोमांचक झालेल्या या सामन्यात भारतीय संघाने १२ धावांनी विजय मिळवला. भारतीय संघाने अत्यंत संघर्ष करत हा विजय मिळवला असला तरी, भारतीय संघातील खेळाडूंच्या खिशाला कात्री लागली आहे. हैदराबाद येथील या सामन्यात भारतीय संघाने निर्धारित वेळेपेक्षा संथ गतीने षटके टाकली. भारतीय संघ निर्धारित वेळेपेक्षा तीन षटके मागे होता. मैदानी पंच नितीन मेनन, अनिल चौधरी तसेच तिसऱ्या व चौथ्या पंचांच्या शिफारसीनुसार, सामन्यानंतर सामनाधिकारी जवागल श्रीनाथ यांनी भारतीय संघाला याबाबतची कल्पना देत कारवाई आयसीसीच्य आचारसंहिता कलम २.२२ नुसार केली. भारतीय कर्णधार रोहित शर्मा याने देखील ही चूक मान्य केली आहे. त्यामुळे रोहितच्या सामना शुल्कातून ६० टक्के तर इतर खेळाडूंच्या सामना शुल्कातून प्रत्येकी २० टक्के रकमेची कपात केली जाईल.
मालिकेतील दुसरा सामना शनिवारी (२१ जानेवारी) रायपूर येथे खेळला जाईल. हा सामना जिंकून भारतीय संघ मालिका आपल्या नावे करण्याचा प्रयत्न करेल. मालिकेतील अखेरचा सामना इंदोर येथे होणार आहे. त्यानंतर उभय संघांमध्ये तीन सामन्यांची टी२० मालिका खेळली जाईल.