इंडियन प्रीमियर लीग (IPL) क्रिकेट स्पर्धेच्या १५व्या हंगामात नवोदित गोलंदाजांपैकी सर्वात जास्त चर्चा उमरान मलिकची झाली. सनरायझर्स हैदराबादसाठी वेगवान गोलंदाजी करणाऱ्या मलिकने हंगामातील सर्वात वेगवान चेंडू टाकून सर्वांचे लक्ष आपल्याकडे खेचले आहे. त्याने इंडियन एक्सप्रेसच्या ‘आयडिया एक्सजेंच’ या सत्रात मैदानावर कोणत्या गोष्टींतून आनंद मिळतो याचा उल्लेख केला आहे. ‘फलंदाजाच्या डोक्यावर बाऊन्सर चेंडू मारण्यात, यॉर्कर चेंडूंचा वापर करून बळी घेण्यात आणि फलंदाजांच्या डोळ्यांतील भीती बघण्यात आपल्याला आनंद मिळतो, असे उमरान मलिक म्हणाला आहे.
जम्मू एक्सप्रेस अशी ओळख मिळालेल्या उमरान मलिकने आयपीएलच्या १५व्या हंगामात १४ सामने खेळून २२ बळी घेतले आहेत. त्याने मॅथ्यू वेड आणि गुजरात टायटन्सचा कर्णधार हार्दिक पंड्यासारख्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडूंना बाउन्सरचा वापर करून बाद केले होते. बाउन्सर आणि यॉर्करचा मारा करून आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूंना बाद करण्यात आपल्याला आनंद मिळतो, ही बाब त्याने मान्य केली आहे.
उमरान म्हणाला, “मी आंद्रे रसेलला बाउन्सर गोलंदाजी केली तर श्रेयस अय्यरला यॉर्कर टाकून बाद केले. या खेळाडूंना बाद करताना मला खूप मजा आली. मॅथ्यू वेडला पॅव्हेलियनमध्ये पाठवतानाही मला फार आनंद झाला होता. माझ्या वेगवान गोलंदाजीमुळे जेव्हा फलंदाजांच्या डोळ्यांत मला भीती उतरलेली दिसते, तो आनंद मी शब्दांत सांगू शकत नाही”.
उमरान मलिकने एका टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेतील आठवणींनाही उजाळा दिला. जम्मूमध्ये एक रात्रीची टेनिस बॉल स्पर्धा झाली होती. त्या स्पर्धेत उमरान खेळत होता. त्याच्या संघातील यष्टिरक्षक, विकीने पॅन्टच्या खिशात फोन ठेवला होता. उमरानने यॉर्कर चेंडू टाकल्यावर तो थेट यष्टिरक्षकाच्या खिशावर जाऊन आदळला आणि त्याच्या फोनचा डिस्प्ले फुटला होता. हा किस्सा आठवल्यानंतर उमरानला आजही हसायला येते.