भारत आणि बांगलादेश संघात तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळली जाणार आहे. या मालिकेला रविवारपासून बांगलादेशमध्ये सुरुवात होणार आहे. परंतु या सामन्यापूर्वी भारतीय संघाला एक मोठा धक्का बसला आहे. वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी खांद्याच्या दुखापतीमुळे बांगलादेशविरुद्धच्या संपूर्ण वनडे मालिकेतून बाहेर पडला आहे. बीसीसीआयने याबाबत माहिती दिली आहे. त्याचबरोबर शमीच्या जागी उमरान मलिकचा वनडे मालिकेसाठी बदली खेळाडू म्हणून संघात समावेश करण्यात आला आहे.
बीसीसीआयने सांगितले की, बांगलादेशविरुद्धच्या वनडे मालिकेच्या तयारी दरम्यान सराव सत्रात वेगवान गोलंदाज शमीच्या खांद्याला दुखापत झाली. तो सध्या बेंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाच्या निरीक्षणाखाली आहे. तसेच तो आता तीन सामन्यांच्या वनडे मालिकेला मुकणार आहे. त्यामुळे त्याची जागी उमरान मलिकला संधी देण्यात आली आहे.
न्यूझीलंडविरुद्धच्या टी-२० आणि एकदिवसीय मालिकेत उमरान टीम इंडियाचा भाग होता. या दौऱ्यात त्याने शानदार गोलंदाजी केली होती. एकदिवसीय मालिकेत तो टीम इंडियासाठी सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज होता. त्याने तीन सामन्यांत तीन विकेट घेतल्या.
हेही वाचा – FIFA World Cup 2022: आजपासून सुपर-१६ लढतींचा थरार, पाहा सर्व सामन्यांचे वेळापत्रक
बांगलादेशविरुद्धच्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी शमीचाही संघात समावेश करण्यात आला आहे. बुमराहच्या अनुपस्थितीत, शमी एकदिवसीय मालिकेत भारतीय वेगवान आक्रमणाचे नेतृत्व करणार होता. भारत आणि बांगलादेश यांच्यातील पहिला एकदिवसीय सामना रविवारी ढाका येथील शेर-ए-बांगला स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.
वनडे मालिकेसाठी टीम इंडिया: रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), शिखर धवन, विराट कोहली, रजत पाटीदार, श्रेयस अय्यर, राहुल त्रिपाठी, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), शाहबाज अहमद, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज, दीपक चहर, कुलदीप सेन, उमरान मलिक.
कसोटी मालिकेसाठी टीम इंडिया: रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), केएस भरत (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव.