विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ सध्या न्यूझीलंड दौऱ्यावर आहे. पहिल्या दोन टी-२० सामन्यात भारतीय संघाने विजय मिळवत मालिकेत आघाडी घेतली आहे. मात्र आगामी टी-२० विश्वचषक लक्षात घेता, संघातली प्रमुख खेळाडूंची तंदुरुस्ती हा संघासाठी चिंतेचा विषय बनलेला आहे. संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याही सध्या आपल्या पाठीच्या दुखापतीमधून सावरण्याचा प्रयत्न करतोय. न्यूझीलंडविरुद्ध आगामी कसोटी सामन्यांच्या मालिकेत हार्दिक संघात पुनरागमन करेल असा अंदाज वर्तवला जात होता. मात्र अजुनही हार्दिक आपल्या दुखापतीमधून सावरला नाहीये, त्यामुळे त्याचं संघातलं पुनरागमन लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.
अवश्य पाहा – फोटो गॅलरी : टीम इंडियाला दुखापतीचं ग्रहण
“हार्दिक पांड्या अजुनही पूर्णपणे तंदुरुस्त नाहीये. राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत त्याच्यावर उपचार सुरु आहेत. त्याला पूर्णपणे फिट होण्यासाठी आणखी काही वेळ जाणार आहे.” आयपीएल गव्हर्निंग काऊन्सिल बैठकीदरम्यान BCCI अध्यक्ष सौरव गांगुलीने पत्रकारांना माहिती दिली. काही महिन्यांपूर्वी हार्दिक पांड्याच्या पाठीवर लंडनमध्ये शस्त्रक्रीया करण्यात आली होती.
अवश्य वाचा – Video : आजही टीम इंडियाच्या बसमध्ये धोनीची जागा राखीव
न्यूझीलंड दौऱ्यानंतर भारतीय संघ घरच्या मैदानावर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वन-डे मालिका खेळणार आहे. यानंतर सर्व खेळाडू आयपीएलच्या तेराव्या हंगामासाठी मैदानात उतरतील, त्यामुळे हार्दिक पांड्या आपल्या दुखापतीमधून कधी सावरतोय हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.