India beat UAE by 10 Wickets reach U19 Asia Cup semi final 2025 : अंडर-१९ आशिया चषक २०२४ मध्ये भारतीय संघाने दमदार कामगिरी करत उपांत्य फेरीत आपले स्थान निश्चित केले आहे. आज भारताचा सामना यूएईशी झाला. ज्यामध्ये भारताने यूएई १० विकेट्सनी मात करत एकतर्फी विजय नोंदवला. आता उपांत्य फेरीतील भारताचे स्थान पक्के झाले आहे. सलग दोन सामने जिंकल्यानंतर भारतीय संघाचे आता चार गुण झाले आहेत. यूएईचा संघ भारताला कोणत्याच बाबतीत आव्हान देऊ शकला नाही, भारतासाठी आयुष म्हात्रे आणि वैभव सूर्यवंशी यांनी पहिला विकेट्साठी १४३ धावांची भागीदारी केली.
यूएई संघाने सामन्यात प्रथम फलंदाजी केली –
यूएईचा कर्णधार इयान खानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, मात्र कर्णधाराचा निर्णय चुकीचा ठरला. यूएई संघाला पहिला धक्का पाचव्या षटकात आर्यन सक्सेनाच्या रुपाने बसला. तो केवळ ९ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. यानंतर युएईचा संघ भारतासमोर आव्हान उभे करू शकेल असे एकदाही वाटले नाही. या संघासाठी सर्वात मोठी धावसंख्या रेयान खानने उभारली, ज्याने ४८ चेंडूत ३५ धावांची खेळी साकारली. तो यूएईचा एकमेव गोलंदाज ठरला, जो या डावात षटकार मारु शकला.
यूएईचा संपूर्ण संघ ४४ षटकांत १३७ धावांत गारद झाला. यानंतर भारताला १३८ धावांचे लक्ष्य मिळाले होते. हे लक्ष्य भारतीय फलंदाजांसमोर अगदीच छोटे होते. भारताचे सलामीवीर वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रे यांनी येताच शानदार फलंदाजी करत संघाची धावसंख्या काही वेळातच ५० धावांपर्यंत नेली. संघाने १०० धावांचा टप्पा ओलांडला तेव्हा १२ वे षटक अजून सुरूच झाले नव्हते. यानंतर या दोन्ही सलामीवीरांनी फटकेबाज सुरुच ठेवत १६.१ षटकांत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केला.
हेही वाचा – ICC Test Rankings : विराट-यशस्वीला शतकानंतरही कसोटी क्रमवारीत बसला फटका, बुमराह अव्वलस्थानी कायम
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रे यांनी झळकावली अर्धशतके –
भारतीय संघाने १६.१ षटकांत एकही विकेट न गमावता १३८ धावा करून सामना जिंकला आणि दोन गुणही मिळवले. भारताकडून वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रे यांनी आपापली अर्धशतके पूर्ण केली. वैभव सूर्यवंशी याने ४६ चेंडूत ७७ धावांची दमदार खेळी साकारली. त्याचबरोबर आयुष म्हात्रेने ५१ चेंडूत ६७ धावांची दमदार खेळी केली. वैभव सूर्यवंशीवर बरेच लक्ष होते, कारण नुकत्याच झालेल्या आयपीएल लिलावात त्याला राजस्थान रॉयल्सने एक कोटींहून अधिक रुपयांना विकत घेतले होते. पहिल्या दोन सामन्यात मोठी खेळी साकारण्यात अपयशी ठरला होता, पण आज त्याने चौकार आणि षटकारांचा वर्षाव केला.