तिरंगी मालिकेवर तिरंगा फडकवण्याच्या ध्येयाने ऑस्ट्रेलियात दाखल झालेल्या भारताच्या १९ – वर्षांखालील संघाने विजयी सलामी दिली आहे. सलामीच्या लढतीत यजमान ऑस्ट्रेलियाला ४७ धावांनी सहज पराभूत केले. सलामीवीर अंकुश बैन्सच्या अर्धशतकाच्या जोरावर भारताला पहिल्यांदा फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियापुढे २२२ धावांचे आव्हान ठेवता आले. भेदक माऱ्याच्या जोरावर भारताने ऑस्ट्रेलियाचा संघ १७४ धावांमध्ये गुंडाळत विजयी सलामी दिली.
तत्पूर्वी, ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून भारताला फलंदाजीसाठी पाचारण केले आणि भारताने त्यांच्यापुढे २२२ धावांचे आव्हान ठेवले. सलामीवीर बैन्सने ५ चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर ६४ धावांची महत्वपूर्ण खेळी साकारत संघाच्या धावसंख्येत मोलाचा वाटा उचलला. कर्णधार विजय झोलनेही सहा चौकारांच्या जोरावर ४६ धावांची खेळी साकारली.
भारताच्या २२२ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाचे फलंदाज ठराविक फरकाने बाद होत राहीले. बेन मॅकडरमॉटने चार चौकारांच्या जोरावर ५० धावांची खेळी साकारत संघाच्या डावाला आधार देण्याचा प्रयत्न केला, पण दुर्देवीरीत्या तो धाव बाद झाला आणि ऑस्ट्रेलियाच्या हातून सामना निसटला. भारताच्या कुलदीप यादवने १९ धावांत ३ विकेट्स घेत ऑस्ट्रेलियाचे कंबरडे मोडले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा