अंडर १९ वर्ल्डकप पटकावणारा भारतीय संघ, प्रशिक्षक आणि सपोर्ट स्टाफवर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) बक्षिसाची उधळण केली असली प्रशिक्षक राहुल द्रविड मात्र बीसीसीआयवर नाराज आहे. विशेष म्हणजे स्वतःला ५० लाख रुपये मिळाले असतानाच सपोर्ट स्टाफला मात्र फक्त २० लाख रुपये दिल्याने द्रविड नाराज असल्याचे समजते. मात्र, यावरुन द्रविडचे कौतुक होत असून द्रविडमधील प्रामाणिकपणा आणि खेळाप्रती असलेली भावना याची प्रचिती पुन्हा एकदा आली.

अंडर- १९ वर्ल्ड कप जिंकणाऱ्या भारतीय संघातील खेळाडूंना बीसीसीआयने प्रत्येकी ३० लाख रुपये, सपोर्ट स्टाफला प्रत्येकी २० लाख रुपये आणि मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडला ५० लाख रुपयांचे पारितोषिक जाहीर केले. मात्र यावरच द्रविड नाराज आहे. खेळाडू आणि सपोर्ट स्टाफपेक्षा मुख्य प्रशिक्षकाला जास्त रकमेचे पारितोषिक जाहीर केल्याबद्दल द्रविडने नाराजी दर्शवली. सपोर्ट स्टाफमधील सर्वांना समान पारितोषिक दिले पाहिजे, असे द्रविडचे म्हणणे असून दुजाभाव होऊ नये यावर द्रविडने भर दिला आहे. द्रविडने त्याचे मत बीसीसीआयपर्यंत पोहोचवल्याचे समजते. सपोर्ट स्टाफमधील प्रत्येक सदस्याने एक टीम म्हणून काम केले आणि भारताला वर्ल्ड कपच्या विजेतेपदापर्यंत पोहोचवण्यात योगदान दिले. त्यामुळे सर्वांना समान पारितोषिकच मिळाले पाहिजे, अशी द्रविडची भूमिका आहे.

सपोर्ट स्टाफमध्ये गोलंदाजी प्रशिक्षक पारस म्हांब्रे, क्षेत्ररक्षण प्रशिक्षक अभय शर्मा, फिजिओथेरेपिस्ट योगेश परमार, ट्रेनर अनंत दाते, मंगेश गायकवाड आणि व्हिडिओ अॅनेलिस्ट देवराज राऊत यांचा समावेश आहे. द्रविडने यापूर्वीही सपोर्ट स्टाफच्या कामाचे कौतुक केले होते. ‘कधी कधी मलाच जास्त प्रसिद्धी मिळते. माझ्याकडे सर्वांचे लक्ष असते. पण सपोर्ट स्टाफमधील प्रत्येकजण माझ्या इतकीच मेहनत घेत असतो’, असे द्रविडने म्हटले होते. द्रविड अंडर १९ संघ आणि भारतीय अ संघाचा प्रशिक्षक असून त्याला बीसीसीआयकडून वर्षाला ३ कोटी रुपयांचे मानधन दिले जाते. वर्ल्डकपसाठी गेले महिनाभर सर्वांनीच अथक मेहनत घेतल्याचे द्रविडने म्हटले आहे.