कोणत्याही परिस्थितीत मी शतकाला गवसणी घालू शकतो, असे सांगत वेस्ट इंडिजचा तडाखेबंद फलंदाज ख्रिस गेल याने प्रतिस्पर्धी संघांना इशारा दिला आहे. मात्र त्यानंतर वातावरणाचा फलंदाजाच्या कामगिरीवर परिणाम होतो, असे सांगत गेलने घूमजाव केले.
‘‘जगातील कोणत्याही खेळपट्टीवर, कोणत्याही परिस्थितीत शतक झळकावण्याची माझी क्षमता आहे. संघाला तशाच प्रकारची सुरुवात करून देण्याची माझी इच्छा असते. माझ्याकडून शतकी खेळी साकारल्यास, ते संघासाठी फायदेशीर ठरेल,’’ असे गेलने सांगितले.
तो म्हणाला, ‘‘फलंदाजीला उतरल्यानंतर प्रत्येक वेळी मोठी खेळी करण्याचे दडपण माझ्यावर असते. पण त्याकडे मी आव्हान म्हणून पाहत असतो. आपल्याकडून चांगली कामगिरी होत गेली, की लोकांच्या अपेक्षाही वाढत जातात. मी चांगली खेळी साकारावी, असे जगभरातील चाहत्यांना वाटत असते. मात्र प्रत्येक वेळी त्यांच्या अपेक्षा पूर्ण होतातच, असे नाही. ट्वेन्टी-२० विश्वचषकाचे गतविजेतेपद राखण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत.’’

Story img Loader