प्रतिस्पध्र्यावर वर्चस्व गाजवूनही पराभूत झाल्यावर सरिता देवीची मानसिक स्थिती मी समजू शकते. मात्र ही परिस्थिती माझ्यावर ओढवली असती तर मी वेगळ्या पद्धतीने निषेध नोंदवला असता, असे मत आशियाई क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदक विजेती बॉक्सर एम. सी. मेरी कोमने व्यक्त केले.
ती पुढे म्हणाली, ‘‘हे प्रकरण आणखी वाढवण्याची आवश्यकता वाटत नाही; परंतु सरिताविषयी मला वाईट वाटते. उपांत्य फेरीच्या लढतीत ती जिंकायला हवी होती. तिचे दु:ख मी समजू शकते. तिच्या लढय़ाला माझा पाठिंबा आहे. मात्र वैयक्तिक स्तरावर मी वेगळ्या पद्धतीने निषेध नोंदवला असता. तो कसा हे मी सांगू शकत नाही. हे माझे वैयक्तिक मत आहे आणि सरिताला माझा पाठिंबा राहील.’’
‘‘भविष्यात पंच आणि सामनाधिकारी योग्य विजेताच जाहीर करतील अशी आशा आहे. यावर मला आणखी काही बोलायचे नाही,’’ असे मेरी कोमने पुढे सांगितले.
उपांत्य फेरीत पराभूत झाल्याने निराश झालेल्या सरिताने पदक प्रदान सोहळ्यात कांस्यपदक स्वीकारण्यास नकार दिला. त्यानंतर तिने हे कांस्यपदक रौप्यपदक विजेत्या खेळाडूच्या गळ्यात घातले. या वर्तनासाठी सरिताने आशियाई ऑलिम्पिक परिषदेची बिनशर्त माफी मागितली.  
कोरियाच्या प्रतिस्पध्र्याविषयी विचारले असता मेरी म्हणाली, ‘‘मी सलामीच्या लढतीतच कोरियन खेळाडूचा सामना केला. मला त्या लढतीत काहीच आक्षेपार्ह जाणवले नाही. सरिताच्या लढतीत तिने ७० टक्के तर माझ्या सामन्यात मी शंभर टक्के वर्चस्व गाजवले होते. मी कोणत्याही प्रतिस्पध्र्याना कमी लेखले नाही. मात्र माझ्या सगळ्या लढती सोप्याच झाल्या.’’

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा