भारतीय संघातील खेळाडूंना रणजीसारख्या स्थानिक महत्त्वपूर्ण सामन्यांमध्ये संधी न देण्याचे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे धोरण अयोग्य आहे, अशा शब्दांत नाराजी व्यक्त करत माजी क्रिकेटपटू व उत्तर प्रदेशचे प्रशिक्षक व्यंकटेश प्रसाद यांनी नव्या वादाला तोंड फोडले आहे.
न्यूझीलंड दौऱ्यासाठी भारतीय संघात निवड झालेल्या सुरेश रैना, भुवनेश्वर कुमार, रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे, स्टुअर्ट बिन्नी, मोहम्मद शामी हे खेळाडू उपांत्यपूर्व फेरीचा सामना खेळू शकले असते. या खेळाडूंना रणजी स्पर्धेत सहभागी होण्यास बीसीसीआयने परवानगी नाकारली. त्याऐवजी या खेळाडूंना १२ जानेवारीला दौऱ्यावर जाण्यास परवानगी देण्यात आली.
‘‘दक्षिण आफ्रिकेतील एकदिवसीय सामन्यांनंतर भुवनेश्वर कुमारने एकही स्थानिक सामना खेळलेला नाही. त्याने जर रणजी सामन्यात भाग घेतला असता तर कर्नाटकची कामगिरी अधिक चांगली झाली असती. त्याचबरोबर त्याला दीर्घ सामन्यांचा सरावही झाला असता,’’ असे प्रसादने सांगितले.
लखनौ येथे झालेल्या रेल्वेविरुद्धच्या सामन्याच्या वेळी प्रसादने बीसीसीआयला पत्र पाठवून या खेळाडूंना स्थानिक सामन्यांमध्ये खेळण्यास परवानगी द्यावी, अशी विनंती केली होती. उपांत्यपूर्व फेरीनंतर हे खेळाडू न्यूझीलंडच्या दौऱ्यावर रवाना होऊ शकतात. १९ जानेवारीला न्यूझीलंड दौऱ्यातला भारताचा पहिला सामना होणार आहे, अशी विनंती केली होती. मात्र त्याची ही विनंती फेटाळण्यात आली.
‘‘राष्ट्रीय संघातील खेळाडूंना तसेच भारतीय संघात प्रवेशाच्या उंबरठय़ावर असलेल्या खेळाडूंना सराव व्हावा, हा रणजी स्पर्धेचा खरा हेतू आहे. मात्र बीसीसीआयच्या चुकीच्या धोरणांमुळे हा हेतू साध्य होत नाही. तसेच वरिष्ठ खेळाडूंसोबत जास्तीत जास्त सामने युवा खेळाडूंनी खेळायला हवेत. भारतीय संघातील खेळाडूंना स्थानिक सामन्यांसाठी प्राधान्य देण्याबाबत संघ व्यवस्थापनाने आग्रह धरला पाहिजे,’’ असेही प्रसादने सांगितले.  

Story img Loader