उदयोन्मुख डावखुरा फिरकी गोलंदाज अंकित चव्हाणवर आजीवन बंदी घालणे हा मुंबई क्रिकेट असोसिएशनसाठी दुर्दैवी दिवस ठरला, असे एमसीएचे सहचिटणीस नितीन दलाल यांनी सांगितले.  
‘‘ही घटना अतिशय दुर्दैवी आहे. भारत ‘अ’ संघात स्थान मिळविण्याच्या तो उंबरठय़ावर होता. मात्र बंदीमुळे त्याची क्रिकेट कारकीर्दच संपुष्टात आली आहे. हरमित सिंगला निदरेष ठरविल्यामुळे तो आता मुंबईकडून पुन्हा खेळू शकेल,’’ असे दलाल म्हणाले.
हरमीतची आजी प्रीतम कौर यांनी हरमीतला निदरेष ठरविण्याच्या निर्णयाचे स्वागत केले. त्या म्हणाल्या, ‘‘या निर्णयाचीच आम्ही प्रतीक्षा करत होतो. सकाळी हरमीतच्या आईकडून ही बातमी कळल्यानंतर मला खूप आनंद झाला.’’
वकील अशोक परांजपे यांच्यामार्फत प्रतिक्रिया देताना हरमीत म्हणाला, ‘‘मी निदरेष आहे, याची मला पूर्णपणे खात्री होती. त्यामुळे पुन्हा सामने खेळण्याचा माझा मार्ग मोकळा झाला आहे.’’ हरमीतने २०१२मध्ये १९ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेत भारताच्या जेतेपदात मोलाची भूमिका निभावली होती.