केंद्र सरकारने आजद मंगळवारी केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी लोकसभेत सरकारची योजना सर्वांसमोर मांडली. अर्थसंकल्पीय भाषणात क्रीडा अर्थसंकल्पाचा उल्लेख करण्यात आला नव्हता, परंतु यावेळी क्रीडा विभागासाठी बजेटमध्ये ३०० कोटी रुपयांपर्यंत निधी वाढवल्याचे समजते

२०२१-२०२२ या वर्षासाठी क्रीडा अर्थसंकल्प २७५७.०२ कोटी रुपये होता, परंतु २०२२-२३ मध्ये क्रीडा अर्थसंकल्प ३०६२.६० कोटी रुपये झाला आहे. यावेळी क्रीडा बजेटमध्ये ३०५.५८ कोटी रुपयांची वाढ करण्यात आली आहे. आशियाई क्रीडा आणि राष्ट्रकूल स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर सरकारने क्रीडा अर्थसंकल्पात निधीची वाढ केली आहे.

यावेळी अर्थसंकल्पात राष्ट्रीय युवा सशक्तीकरण कार्यक्रमासाठी निधीची वाढ करण्यात आली आहे. मागील वर्षी १०८ कोटी रुपये खर्च करण्यात आले होते, तर यावेळी १३८ कोटी रुपये देण्यात आले आहेत. विशेष म्हणजे खेलो इंडिया कार्यक्रमाचे बजेटही वाढवण्यात आले आहे, मागील वर्षी ते ८७९ कोटी रुपये होते, ते यावेळी ९७४ कोटी रुपये करण्यात आले आहे.

हेही वाचा – Budget 2022 Highlights: नवी करन्सी, 5G, ई-चीप पासपोर्ट आणि इन्कम टॅक्स; जाणून घ्या अर्थसंकल्पातून नेमकं काय मिळालं?

क्रीडा अर्थसंकल्पांतर्गत, ऑलिम्पिक स्पर्धेची सर्व तयारी, भारतीय क्रीडा प्राधिकरण (SAI), अॅथलेटिक्स प्राधिकरणासह इतर संस्थांचे बजेटही जाहीर केले जाते.