Union Budget for Sports: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मंगळवारी संसदेत २०२२-२३ या आर्थिक वर्षाचा केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात सरकारने क्रीडा मंत्रालयाला पूर्वीपेक्षा जास्त निधी देण्याची योजनाही मांडली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत ११.०८ टक्के वाढ झाली आहे. यंदाच्या अर्थसंकल्पातून क्रीडा मंत्रालयाला ३०६२.६० कोटी रुपये अधिक मिळणार असून, गेल्या वर्षीच्या तुलनेत ३०५.५८ कोटी रुपये अधिक आहेत. भारतातील तरुणांच्या सर्वांगीण विकासासाठी युवा कार्य विभागाच्या अंतर्गत असलेल्या राष्ट्रीय युवा सक्षमीकरण कार्यक्रमाला या अर्थसंकल्पात मागील वर्षीच्या तुलनेत २९ कोटी रुपये अतिरिक्त मिळाले आहेत.
एका निवेदनात क्रीडा मंत्रालयाने म्हटले आहे की, “राष्ट्रीय सेवा योजनेला (NSS) २८३.५० कोटी रुपये देण्यात आले आहेत, जे २०१२-२२ च्या बजेट अंदाजात २३१ कोटी रुपये होते. नॅशनल युथ कॉर्प्सच्या योजनेंतर्गत तरुणांना राष्ट्र उभारणीच्या कार्यात सहभागी करून घेण्याचे उद्दिष्ट असलेल्या त्यांना यावर्षी ७५ कोटी रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. युवाशक्तीला सक्षम करण्यासाठी १८ कोटी रुपये अतिरिक्त दिले जाणार आहेत.
भारतातील तळागाळात खेळांचा विकास करणारी प्रमुख योजना, खेलो इंडिया योजनेसाठी तरतूद करण्यात आलेल्या बजेटमध्ये मोठी वाढ करण्यात आली आहे. खेलो इंडिया योजनेसाठी ९७४ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे, जी मागील बजेटच्या तुलनेत ४८.०९ टक्क्यांनी वाढली आहे. जम्मू-काश्मीरमध्ये क्रीडा सुविधा वाढवण्यासाठी सरकारने २०२२-२३ मध्ये बजेट १५ कोटींवरून ५० कोटींपर्यंत वाढवले आहे. ईशान्य विभागातील क्रीडा विकासासाठी ३३०.९४ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे, जी मागील वर्षी २७६.१९ कोटी रुपये होती.
स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया (SAI) ही स्वायत्त संस्था, जी देशातील खेळाडूंचे प्रशिक्षण आणि सुविधा पाहते, या अर्थसंकल्पात ६५३ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. ते पुढे म्हणाले, “राष्ट्रीय क्रीडा महासंघांच्या बजेटमध्ये २०२१-२२ मधील अंदाजपत्रक १८१ कोटी रुपयांवरून २८० कोटी रुपयांपर्यंत वाढवून या बजेटमध्ये खेळाडूंना चांगल्या सुविधा उपलब्ध होतील. यामुळे आगामी राष्ट्रकुल आणि आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारतीय खेळाडूंच्या तयारीला बळ मिळेल.” अर्थसंकल्पावर बोलताना क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर म्हणाले, “अर्थसंकल्प हा भारताच्या आकांक्षा आणि आशा पूर्ण करण्यासाठी ब्लू प्रिंट आहे.”