नवी दिल्ली : कुस्तीगिरांच्या चिघळत चाललेल्या आंदोलनात शुक्रवारी केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांनी कुस्तीगिरांना यंत्रणेवर विश्वास ठेवण्याची विनंती केली. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने याचिका फेटाळल्यामुळे  कुस्तीगीर आता नव्या वाटचालीचा विचार करत आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासंदर्भात कुस्तीगिरांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेली याचिका गुरुवारी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली. त्यानंतर शुक्रवारी कुस्तीगिरांना पाठिंबा देण्यासाठी येणाऱ्या नव्या मल्लांना पोलिसांनी रोखले. मात्र, न्यायासाठी लढणाऱ्या कुस्तीगिरांची काही शेतकऱ्यांनी भेट घेतली. शेतकरी, अनेक राजकीय व्यक्ती कुस्तीगिरांना भेट देत असल्या तरी आंदोलनाच्या १३व्या दिवशी नेहमीसारखा उत्साह नव्हता.

एकूण परिस्थितीवर बोलताना बजरंग पुनिया म्हणाला, ‘‘आम्हाला सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय मान्य आहे. आता आमचा कायदेशीर गट नवा विचार करत आहे. पुढे काय करायचे या संदर्भात विचारविनिमय सुरू आहे.’’

दरम्यान, लखनऊमध्ये खेलो इंडियाच्या एका कार्यक्रमात बोलताना क्रीडामंत्री अनुराग ठाकूर म्हणाले, ‘‘कुस्तीगिरांच्या ज्या काही मागण्या असतील, त्या पूर्ण केल्या जातील. त्यांनी आम्हाला भेटावे. दिल्ली पोलीस त्यांचे काम करत आहेत. तपासाने वेग घेतला आहे. अल्पवयीन मुलीसह पाच मल्लांचे जबाब घेण्यात आले आहेत. पोलिसांना त्यांचे काम करू द्या, ते योग्य तीच आणि कायद्यानुसार कठोर कारवाई करतील.’’

दरम्यान, आंदोलक कुस्तीगिरांपाठोपाठ आता कुस्ती प्रशिक्षक महावीर फोगट यांनीही पुरस्कार परत करण्याचा इशारा दिला आहे. आंदोलनात आघाडीवर असलेल्या विनेश फोगटचे ते काका आहेत. महावीर यांना २०१६ मध्ये द्रोणाचार्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. ‘‘या प्रकरणात ज्यांच्यावर आरोप आहेत, त्यांच्यावर कारवाई व्हायलाच हवी. यामध्ये न्याय मिळाला नाही तर मी माझे पुरस्कार परत करेन,’’ असे महावीर म्हणाले. विशेष म्हणजे महावीर फोगट तीन वर्षांपूर्वी भाजपचे सदस्य बनले आहेत.

मी या प्रकरणावर बोलणे योग्य नाही. मला याबद्दल काहीच माहीत नाही. मी फक्त वृत्तपत्रांतून वाचत आहे. जी गोष्ट आपली नाही, त्याबद्दल कसे बोलणार. त्यांना त्यांची लढाई लढू द्या. तेच योग्य आहे. -सौरभ गांगुली, भारताचा माजी क्रिकेट कर्णधार

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Union sports minister anurag thakur appealed wrestlers to have faith in system zws