भारतीय कुस्ती महासंघाच्या अध्यक्षपदी संजय सिंह यांची निवड झाली होती. यांच्या निवडीअंतर्गत स्थापन झालेल्या कमिटीला केंद्र सरकारने निलंबित केलं आहे. तसंच, संजय सिंह यांचंही निलंबन करण्यात आलं आहे. संजय सिंह यांनी अध्यक्षपदी निवड होताच नंदिनी नगर, गोंडा येथे अंडर १५ आणि अंडर २० खेळाडूंची स्पर्धा घोषित केली होती. यावरून कुस्तीपटू साक्षी मलिकनेही जाहीर टीका केली होती. त्यानंतर, केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने संजय सिंग यांच्या अध्यक्षतेखाली असलेली कमिटीच निलंबित केली.

राष्ट्रीय स्पर्धांची घोषणा करणे घाईचे ठरले आहे. तसंच स्पर्धा जाहीर करताना योग्य प्रक्रिया पाळली गेली नाही, असं क्रीडा मंत्रालयाने म्हटलं आहे. नवनिर्वाचित मंडळाचे अध्यक्ष संजय कुमार सिंह यांनी २१ डिसेंबर रोजी जाहीर केले की कनिष्ठ राष्ट्रीय स्पर्धा या वर्षाच्या समाप्तीपूर्वी सुरू होतील. ही प्रक्रिया नियमांच्या विरुद्ध आहे. स्पर्धा जाहीर करताना खेळाडूंना किमान १५ दिवसांचा अवधी देणे गरजेचे आहे, असं क्रीडा मंत्रालयाने म्हटलं. “असे निर्णय (होल्डिंग नॅशनल) कार्यकारी समितीने घेतले पाहिजेत, त्याआधी अजेंडा विचारात घेणे आवश्यक आहे. ‘मीटिंग्जसाठी सूचना आणि कोरम’ या शीर्षकाखाली WFI घटनेच्या कलम XI नुसार, कार्यकारी समितीच्या बैठकीसाठी १५ दिवसांची पूर्वसूचना देणे आणि समितीत एक तृतीयांश प्रतिनिधी असणे गरजेचे आहे. तर, आपत्कालीन परिस्थिती निदान सात दिवसांची पूर्वसूचना देणे गरजेचे असते, असं मंत्रालयाने नमूद केलं आहे.

नवं मंडळ जुन्या पदाधिकाऱ्यांच्या नियंत्रणात

मंत्रालयाने म्हटले आहे की, “नवनिर्वाचित मंडळ माजी पदाधिकाऱ्यांच्या पूर्ण नियंत्रणात आहे. तसंच, क्रीडा संहितेकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. “फेडरेशनचा कारभार माजी पदाधिकाऱ्यांच्या नियंत्रणाखाली असलेल्या जागेतून चालवला जात आहे. ज्या जागेवर खेळाडूंचा लैंगिक छळ केल्याचा आरोपही करण्यात आला आहे आणि न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे”, असे त्यात पुढे म्हटले आहे.