भारताला १९ वर्षांखालील विश्वचषक जिंकून देणाऱ्या उन्मुक्त चंदने निवृत्तीनंतर एक विशेष कामगिरी केली आहे. वयाच्या २८ व्या वर्षी देश सोडल्यानंतर तो क्रिकेट खेळण्यासाठी अमेरिकेत गेला. तिथे त्याने दमदार सुरुवात करत आपला नवा प्रवास सुरू केला. आता त्याने आणखी एक खास कामगिरी आपल्या नावावर केली आहे. बिग बॅश लीगमध्ये (BBL) सामील होणारा तो पहिला भारतीय पुरुष क्रिकेटपटू ठरला आहे.
बिग बॅश संघ मेलबर्न रेनेगेड्सने जाहीर उन्मुक्त चंदला करारबद्ध केले आहे. भारतीय महिला क्रिकेटपटू दीर्घ काळापासून महिला बिग बॅश लीगसह जगभरातील देशांतर्गत लीगमध्ये खेळत आहेत, परंतु भारतातील आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत पुरुष खेळाडूंना परदेशात क्रिकेट खेळण्याची परवानगी नाही.
हेही वाचा – T20 WC : भारत-अफगाणिस्तान सामन्यात फिक्सिंग?; ‘तो’ फोटो व्हायरल होताच नेटकऱ्यांनी म्हटलं ‘well paid india’!
सलामीवीर उन्मुक्तने अलीकडेच अमेरिकेत खेळण्यासाठी भारतीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. याचा अर्थ तो बीबीएल आणि उर्वरित देशांतर्गत लीग खेळण्यास मुक्त आहे. निवृत्तीच्या निर्णयाबाबत उन्मुक्त म्हणाला की, ”खरे सांगायचे तर ते सोपे नव्हते. वस्तुस्थिती अशी आहे की मी यापुढे देशासाठी खेळणार नाही. हे स्वीकारणे कठीण आहे, परंतु मी अमेरिकेसाठी खेळण्याचा आनंद घेत आहे. हे दररोज चांगले होत आहे आणि आता मी जगभरातील सर्व लीग खेळू शकतो. व्यक्तिशः माझ्यासाठी ही मोठी उपलब्धी आहे. मला बिग बॅश लीग बघायला खूप आवडते. हा एक चांगला टप्पा आहे आणि मला तिथे खेळायचे होते.”
उन्मुक्त चंदची कारकीर्द
उन्मुक्तने ६७ कसोटीत ३१.५७च्या सरासरीने ३३७९ धावा केल्या. त्याने या फॉरमॅटमध्ये आठ शतके आणि १६ अर्धशतके केली. याचबरोबर त्याने १२० लिस्ट ए सामन्यांमध्ये ४५०५ धावा केल्या. येथे त्याच्या नावावर सात शतके आणि ३२ अर्धशतके होती. उन्मुक्तने ७७ सामन्यांमध्ये तीन शतके आणि पाच अर्धशतकांच्या मदतीने १५६५ धावा केल्या. २०१२चा १९ वर्षाखालील विश्वचषक जिंकल्यानंतर तो पहिल्यांदा प्रकाशझोतात आला. त्यानंतर त्याने अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध १११ धावांची नाबाद खेळी केली आणि भारताला विश्वचषक जिंकून दिला.