भारतीय संघाचा यष्टीरक्षक ऋषभ पंत सध्या आपल्या फलंदाजीतल्या खराब फॉर्ममुळे चांगलाच अडणीत आला आहे. विश्वचषकात भारतीय संघाचं आव्हान संपुष्टात आल्यानंतर निवड समितीने धोनीला डावलून ऋषभला भारतीय संघात स्थान दिलं. मात्र विंडीज दौऱ्यात ऋषभ पंतने फलंदाजीत पुरती निराशा केली. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दुसऱ्या टी-२० सामन्यातही ऋषभ बेजबाबदार फटका खेळू बाद झाला. यानंतर ऋषभला चाहत्यांच्या रोषाचा सामना करावा लागत आहे. मात्र असं असलं तरीही ऋषभ पंतवर इतकी कठोर टीका करण्याची गरज नसल्याचं मत भारताचा माजी जलदगती गोलंदाज अजित आगरकरने व्यक्त केलं आहे.

“ऋषभवर सध्या जी काही टीका होतेय ते पाहून मला खरतर विश्वासच बसत नाहीये. त्याने भारताबाहेर कसोटीमध्ये दोन शतकं झळकावली आहेत. तो आजही उपयुक्त खेळी करु शकतो. टी-२० क्रिकेटमध्ये काहीवेळा तुम्हाला आक्रमक व्हावं लागतं, हवेतून फटके खेळावे लागतात. ऋषभकडून भारतीय संघाला नेमक्या काय अपेक्षा आहेत हे आधी ठरवावं लागणार आहे. ऋषभ तुम्हाला चौथ्या क्रमांकावर येऊन संघाचा डाव सावरणारा खेळाडू म्हणून हवाय की तो एक आक्रमक खेळाडू म्हणून हवाय हे नक्की करावं लागेल. काही सामन्यांसाठी श्रेयस अय्यरला चौथ्या क्रमांकावर संधी देऊन श्रेयसला मधल्या फळीत खेळवता येऊ शकतं. सध्याच्या घडीला ऋषभवर अवास्तव दबाव आणि टीका केली जात आहे.” आगरकर EspnCricinfo या संकेतस्थळाशी बोलत होता.

वेस्ट इंडिज दौऱ्यातील अखेरच्या टी-२० सामन्यातलं अर्धशतक सोडलं तर ऋषभची गेल्या काही दिवसांमधली फलंदाजीतली कामगिरी फारशी चांगली नाही. भारताचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री, फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोडही ऋषभच्या कामगिरीवर नाराज असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे आफ्रिकेविरुद्ध मालिकेत इतर सामन्यांत ऋषभ आपल्या फॉर्मात येतो का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Story img Loader