बार्सिलोनाचा विजय रोनाल्डोचा विक्रमी गोल माद्रिद अव्वल स्थानावर
नेयमारच्या नेत्रदीपक खेळाच्या जोरावर युरोपियन विजेत्या बार्सिलोनाने ला लिगा फुटबॉल स्पध्रेत रायो व्हॅलेकानोचा ५-२ असा धुव्वा उडवत आगेकूच केली. नेयमारच्या चार गोलमुळे क्लबला दुखापतग्रस्त लिओनेल मेस्सीची उणीव भासली नाही. मात्र, नेयमारचा हा खेळ रिअल माद्रिदच्या ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या विक्रमाने झाकोळला गेला. रोनाल्डोने सर्वाधिक गोलच्या विक्रमाची नोंद करून माद्रिदला लेव्हँटेवर ३-० असा सोपा विजय मिळवून दिला.
जॅव्ही गुएराने पहिला गोल करून रायो क्लबला १-० अशी आघाडी मिळवून दिली, परंतु नेयमारने मिळालेल्या दोन पेनल्टीचे रूपांतर गोलमध्ये करून मध्यंतराला बार्सिलोनाला २-१ अशा आघाडीवर आणले. उत्तरार्धात एका मिनिटाच्या आत नेयमारने पुन्हा दोन गोल करून बार्सिलोनाचा विजय निश्चित केला. लुइस सुआरेझने अखेरचा गोल केला. रायोकडून जोझाबेडने दुसरा गोल केला. ‘‘या विजयाने मी खूप खूश आहे. या विजयाचे श्रेय सर्वाना जाते. रायोकडे गुणवत्तावंत खेळाडू होते आणि त्यांच्याविरुद्ध खेळ करणे अवघड होते. सुरुवातीला आम्हाला झगडावे लागले, परंतु आम्ही चोख कामगिरी बजावली,’’ असे मत नेयमारने व्यक्त केले.
दुसरीकडे रोनाल्डोने पुन्हा एकदा आपला दबदबा सिद्ध करताना माद्रिदला विजय मिळवून दिला. लेव्हँटेविरुद्धच्या लढतीत २७व्या मिनिटाला मार्सेलोने माद्रिदचे खाते उघडले. त्यानंतर अवघ्या तीन मिनिटांत माद्रिदने गोल करून ही आघाडी २-० अशी मजबूत केली. रोनाल्डोने या गोलबरोबर क्लबसाठी सर्वाधिक गोल करणाऱ्या रॉल गोंझालेज (३२३) यांचा विक्रम मोडला. रोनाल्डोच्या खात्यात एकूण ३२४ गोल जमा झाले आहेत. जेसेने ८१व्या मिनिटाला गोल करून माद्रिदचा ३-०ने विजय निश्चित केला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा