A check of Rs 3 crore to Deepti Sharma Appointment letter for the post of Deputy SP : भारतीय महिला क्रिकेट संघाची स्टार अष्टपैलू खेळाडू दीप्ती शर्मासाठी आजचा दिवस खूप खास आहे. आग्रा येथील या क्रिकेटपटूला यूपी पोलिसात डीएसपी पद देण्यात आले आहे. आपल्या कामगिरीच्या जोरावर दीप्तीने अनेक महत्त्वाच्या सामन्यांमध्ये भारताला विजय मिळवून दिला आहे. गेल्या वर्षी चीनमध्ये खेळल्या गेलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताला सुवर्णपदक मिळवून देण्यात महिला क्रिकेटचाही महत्त्वाचा वाटा होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दीप्तीला मिळाले डेप्युटी एसपी पदाचे नियुक्तीपत्र –

आग्राच्या अवधपुरी भागात राहणाऱ्या दीप्ती शर्माचा उत्तर प्रदेश सरकारकडून सत्कार करण्यात आला आहे. तिने अष्टपैलू कामगिरीने मिळवलेल्या यशाचे उत्तर प्रदेश सरकारने कौतुक केले. मुख्यमंत्री योगी यांनी शनिवारी तिचा गौरव केला. यावेळी दीप्तीला तीन कोटी रुपयांचा धनादेश देण्यात आला आणि डेप्युटी एसपी पदाचे नियुक्तीपत्र सुपूर्द करताना त्यांनी तिच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

गेल्या वर्षी चीनमध्ये झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत टीम इंडियाने महिला क्रिकेटमध्ये सुवर्णपदक जिंकण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. यापूर्वी २०२३ मध्ये दीप्तीने बर्मिंगहॅम (इंग्लंड) येथे झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतीय महिला क्रिकेट संघासाठी रौप्य पदकही जिंकले होते. दीप्तीने भारतीय महिला संघाला एकदाच नव्हे तर अनेक वेळा विजय मिळवून दिला आहे.

हेही वाचा – IND vs ENG Test : टीम इंडियासाठी वाईट बातमी! रवींद्र जडेजा संपूर्ण मालिकेतून होऊ शकतो बाहेर, जाणून घ्या कारण

दीप्ती शर्मा मंगळवारी जाहीर झालेल्या नवीन आयसीसी महिला टी-२० क्रमवारीत संयुक्त दुसऱ्या स्थानावर पोहोचली आहे. त्याचबरोबर तिची सहकारी गोलंदाज रेणुका सिंह ठाकूर हिनेही एका स्थानाचा फायदा घेतला असून ती गोलंदाजांच्या क्रमवारीत १०व्या स्थानावर पोहोचली आहे. दक्षिण आफ्रिकेची फिरकीपटू नॉनकुलुलेको लाबाच्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या निराशाजनक कामगिरीचा दीप्तीला फायदा झाला. लाबाने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दोन सामन्यात केवळ एक विकेट घेतली होती. यामुळे ती तीन स्थानांनी घसरली आणि दुसऱ्या स्थानावरून थेट पाचव्या स्थानावर गेली.

हेही वाचा – Shikhar Dhawan : मुलगा जोरावरबद्दल बोलताना शिखर झाला भावुक; म्हणाला, “माझ्या मुलाला…”

दीप्ती शर्माची क्रिकेट कारकीर्द कशी आहे?

२६ वर्षीय दीप्ती शर्माने भारतासाठी आतापर्यंत ४ कसोटी, ८६ वनडे आणि १०४ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. या कालावधीत तिने कसोटीत ३१७ धावा आणि १६ विकेट्स घेतल्या. त्याचबरोबर वनडेत १९८२ धावा करताना १०० विकेट्स घेतल्या आहेत. तसेच टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १०१५ धावा आणि ११३ विकेट्स घेतल्या आहेत. दीप्तीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एक शतक आणि १८ अर्धशतकेही झळकावली आहेत. सध्या ती टीम इंडियाची सर्वात विश्वासार्ह क्रिकेटर आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Up chief minister yogi handed over a check of rs 3 crore to deepti sharma cricketer for the post of deputy sp vbm
Show comments