RCB-W vs UPW-W : मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर महिला प्रिमीयर लीगचा आठवा सामना रॉयल चॅलेंजर्स बॅंगलोर आणि युपी वॉरियर्स यांच्यात झाला. आरसीबीने २० षटकात १३८ धावांचं आव्हान यूपी वॉरियर्सला दिलं होतं. यूपी वॉरियर्सने भेदक गोलंदाजी करून आरसीबीच्या आख्ख्या संघाला १३८ धावांवर गारद केलं. त्यानंतर १३९ धावांचा पाठलाग करणाऱ्या यूपी वॉरियर्सच्या फलंदाजांनी आरसीबीची पुरती दमछाक केली. सलामीला आलेल्या अॅलिसा हिली आणि दिपीका वैद्यने आरसीबीच्या गोलंदाजांचा धुव्वा उडवत तेरा षटकांमध्ये १३९ धावा करत संघाला मोठा विजय संपादन करून देला. कर्णधार अॅलिसाने ४७ चेंडूत ९६ धावांची आक्रमक खेळी केली. तर देविका वैद्यने ३१ चेंडूत ३६ धावा कुटल्या. यूपी वॉरियर्सच्या सलामी फलंदाजांनीच १३९ धावांचं लक्ष्य गाठल्याने क्रिकेटविश्वात सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.
आरसीबीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर सलामीसाठी मैदानात उतरलेल्या कर्णधार स्मृती मानधनाने पुन्हा एकदा निराशाजनक कामगिरी केली. या सामन्यातही स्मृतीला धावांचा सूर न गवसल्याने ती अवघ्या ४ धावांवर बाद झाली. २९ धावांवर आरसीबीची पहिली विकेट पडली. पण सोफी डिवाईन आणि एलिस पेरी यांनी आरसीबीचा डाव सावरत फलकावर धावसंख्येचा आलेख चढता ठेवला. पेरीने ३९ चेंडूत ५२ धावांची आक्रमक खेळी केली.
प्रथम फलंदाजी करण्याच्या इराद्यात उतरलेल्या आरसीबीला सुरुवातीला अपेक्षित असा धावांचा सूर गवसला नाही. मात्र, एलिस पेरी आणि सोफी डिवाईनच्या आक्रमक फलंदाजीमुळं आरसीबीची धावसंख्या वेगान वाढून ५० वर पोहोचली. परंतु, युपी वॉरियर्सच्या एकलस्टोनने भेदक गोलंदाजी करून सोफीला ३६ धावांवर बाद करत धावसंख्येला ब्रेक लावला. राजश्री गायकवाडने स्मृती मानधनाला ४ धावांवर बाद केलं. मात्र, सोफी डिवाईन आणि एलिस पेरी यांच्या चौफेर फटकेबाजीमुळं आरसीबीची धावसंख्या ९ षटकात ७३ वर पोहोचली होती.
आरसीबीसाठी कर्णधार स्मृती मानधनाने अवघ्या ४ धावाच केल्या. पण स्मृतीसोबत मैदानात उतरलेल्या सोफीने मात्र मैदानात फलंदाजीचा जलवा दाखवला. सोफीने २४ चेंडूत ३६ धावा केल्या. परंतु, एलिस पेरीने युपी वॉरियर्सच्या गोलंदाजांचा धुव्वा उडवला. पेरीने ३९ चेंडूत ५२ धावा कुटल्या. दिप्ती शर्माच्या फिरकी गोलंदाजीवर पेरीने षटकार मारण्याचा प्रयत्न केला पण सीमारेषेजवळ असलेल्या ताहिलाने पेरीचा झेल घेतला. कनिका आहुजाने ८ धावा, हेदर नाईटने (२), श्रेयंका पाटील (१५) धावा केल्या. तर बर्न्स १२ धावा करून तंबूत परतली. युवी वॉरियर्ससाठी एकलस्टोनने 3, दिप्ती शर्माने ३ आणि राजश्री गायकवाडने १ विकेट घेतली.