मुंबई क्रिकेट असोसिएशनची (एमसीए)ची ८०वी वार्षिक सर्वसाधारण सभा अपेक्षेप्रमाणेच वादळी ठरली. या बैठकीत भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) खेळ विकास महाव्यवस्थापक प्रा. रत्नाकर शेट्टी यांना विश्वचषक तिकिटांप्रकरणी क्लीन चिट देण्यात आली. केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली आणि मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या उपस्थितीत झालेल्या या सभेत अनेक वादग्रस्त आणि क्रिकेटच्या विषयांवर सुमारे पावणेतीन तास चर्चा झाली आणि त्यामुळे वातावरण चांगलेच तापले.
एमसीएची निवडणूक लांबणीवर टाकल्याबद्दल सर्व विरोधकांनी मावळते अध्यक्ष रवी सावंत यांना धारेवर धरले. शेट्टी यांनी सावंत यांना एमसीएच्या निवडणुकीला उशीर केल्याचे कारण विचारले. माझा खटला न्यायालयात होता, म्हणून तुम्ही निवडणुकीला उशीर केला का, असा सवाल सावंत यांना केला. या वेळी क्रिकेट प्रशासक रवी मांद्रेकर यांनी बीसीसीआयची निवडणूक झाली नव्हती, अशी पुस्ती जोडली. तथापि, भारताचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर यांनी म्हटले की, ‘‘निवडणुकीला उशीर होण्यास तुम्ही अध्यक्ष म्हणून का जबाबदार नाहीत.’’ याबाबत स्पष्टीकरण देताना सावंत म्हणाले की, ‘‘आयपीएल कार्यक्रमामुळे निवडणुकीला उशीर झाला. हा निर्णय कार्यकारिणी समितीच्या बैठकीमध्ये सर्वसंमतीने घेण्यात आला होता.’’
२०११च्या विश्वचषक क्रिकेट स्पध्रेच्या अंतिम फेरीतील ४०५ तिकिटे विकली न गेल्याच्या मुद्दय़ावरून वातावरण चांगलेच तापले. हा अहवाल निवडणुकीच्या तोंडावर प्रकाशित करून एमसीएची अनेक वष्रे सेवा करणाऱ्या व्यक्तीची प्रतिमा डागाळण्याचा प्रयत्न करण्यात आला, असे मत रत्नाकर शेट्टी यांनी मांडले. तक्रारदार हाच या संदर्भातील चौकशी समितीचा सदस्य कसा असू शकतो, या मुद्दय़ावरून पुन्हा रणकंदन पेटले. याबाबत शरद पवार यांनीही तक्रारदार हा चौकशी समितीचा सदस्य असू नये, असे मत मांडले. ते पुढे म्हणाले की, ‘‘या अहवालावर एकाचीच स्वाक्षरी आहे, त्यामुळे तो आपण स्वीकारू शकत नाही. जर कुणी तो वृत्तपत्रांना दिला असेल, तर तो जाणीवपूर्वक दिला आहे. या प्रकरणी पैसे कुठेच बाहेर गेले नसल्यामुळे एमसीएला तोटा झालेला नाही. त्यामुळे हे प्रकरण आता बंद करावे.’’
याचप्रमाणे सामन्यांसाठी क्लब्जना मिळणाऱ्या मोफत सन्मानिकांच्या वाटपाचे योग्य धोरण तयार करण्यात यावे, अशी विनंती शेट्टी यांनी केली. या वेळी मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या दोनशेव्या सामन्यासाठी एक सन्मान समिती स्थापन करण्यात आली. या समितीमध्ये शरद पवार, रत्नाकर शेट्टी, मिलिंद रेगे, विनोद देशपांडे आणि श्रीपाद हळबे यांचा समावेश असेल.