Steve Smith, ENG vs AUS, Ashes 2023: ‘द ओव्हल’ येथे इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात अॅशेस मालिका सुरु आहे. ५व्या सामन्याच्या दुसऱ्या दिवशी, थर्ड अंपायर नितीन मेनन यांनी स्टीव्ह स्मिथचा धावबाद नाबाद असल्याचे म्हटले तेव्हा गोंधळ झाला. भारतीय अंपायरच्या या निर्णयामुळे संपूर्ण इंग्लंड संघासह त्याचे चाहतेही निराश झाले होते. दुसरीकडे खुद्द स्टीव्ह स्मिथनेही या निर्णयामुळे आश्चर्य व्यक्त केले होते. जरी त्याने या लाईफलाइनचा फायदा घेत संघासाठी काही महत्त्वाच्या धावा जोडल्या तरी त्याला या निर्णयावर विश्वास बसत नव्हता. थर्ड अंपायरच्या या निर्णयाबाबत सोशल मीडियावर काही वेळातच वेगवेगळ्या प्रतिक्रिया येऊ लागल्या, अशा परिस्थितीत एमसीसीला पुढे येऊन नियम स्पष्ट करावे लागले.
ऑस्ट्रेलियन डावाच्या ७८व्या षटकात, स्टीव्ह स्मिथने पॅट कमिन्ससह दोन धावा घेण्यासाठी लेग साइडला फटका खेळला. दोघांनी खेळपट्टी दरम्यान जबरदस्त धावा केल्या, परंतु पर्यायी क्षेत्ररक्षक जॉर्ज एल्हॅम मैदानात खूप सक्रिय दिसत होता. त्याचा थ्रो इतका अचूक होता की तो चेंडू थेट बेअरस्टोच्या ग्लोव्हजमध्ये गेला आणि इंग्लंडच्या यष्टीरक्षकाने स्टंप बेल्स उडवले. स्टीव्ह स्मिथने तो आऊट झाल्याचा समज करून पॅव्हेलियनच्या दिशेने काही पावले टाकली. या विकेटनंतर इंग्लंडने एकच जल्लोष केला. पण आनंद साजरा करत असताना अचानक हा निर्णय तिसऱ्या अंपायरकडे गेला. या सामन्यात भारताचे अंपायर नितीन मेनन हे थर्ड अंपायरची भूमिका बजावत आहेत. जेव्हा थर्ड अंपायर नितीन मेनन यांनी अनेक फ्रेम्स पाहिल्यानंतर आपला निर्णय दिला तेव्हा सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. मेननने स्मिथला नाबाद म्हटले.
स्टीव्ह स्मिथला नॉट आऊट देण्याच्या या निर्णयावर इंग्लंड संघासह खुद्द स्मिथ सुद्धा आश्चर्यचकित झाला. त्यानंतर इंग्लंडच्या प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त करत अंपायरवर टीका केली. काहीवेळा करिता मैदानात प्रेक्षक आक्रमक झाले होते. यासर्व घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
काय सांगतो एमसीसीचा नियम?
‘कायदा २९.१ नुसार विकेट पडली हे त्याच वेळी मानलं जात ज्यावेळी स्टंपवरील एकतरी बेल्स ही पूर्णपणे उडून निघून गेली असेल किंवा स्टंप उखडून पूर्णपणे जमिनीवर पडला असेल.’ स्टीव्ह स्मिथच्या रन आऊट व्हिडीओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे की, जॉनी बेअरस्टोने थ्रो केलेला चेंडू ग्लोव्हज मध्ये येताच तो बेल्सवर हिट करायला जातो. जेव्हा तो चेंडू हातात घेऊन बेल्स उडवायला जातो तेव्हा स्मिथ क्रीझच्या बाहेर होता. परंतु संपूर्ण बेल्स स्टंपवरून हवेत उडाल्या किंवा निघाल्या होत्या. ना स्टंप उखडून पूर्णपणे जमिनीवर पडले होते. त्याच्याच पुढच्या फ्रेम मध्ये जेव्हा बेल्स हवेत उडाल्या त्यावेळी स्मिथ पूर्णपणे क्रीझमध्ये पोहचला होता. त्यामुळेच नितीन मेनन यांनी त्याला नॉट आऊट घोषित केले.
नितीन मेनन यांचे जोरदार कौतुक होत आहे
भारतीय आजी-माजी खेळाडूंनी सोशल मीडियावर भारतीय अंपायर नितीन मेनन यांचे क्लोज कॉलचे कौतुक केले आहे. आर. अश्विनने ट्वीट केले की, “योग्य निर्णय घेतल्याबद्दल नितीन मेननचे कौतुक करावे लागेल.” त्याचवेळी आकाश चोप्राने ट्वीट करून म्हटले की, “शाब्बास, नितीन मेनन. चांगला निर्णय. अवघड निर्णय. ऑस्ट्रेलियाच्या संघाने पहिल्या डावात २९५ धावा केल्या. यासह त्यांनी १२ धावांची आघाडी घेतली आहे. या स्पर्धेत ऑस्ट्रेलिया २-१ ने आघाडीवर आहे. जर त्यांनी ही कसोटी जिंकली तर ते २०२३ ची अॅशेस ट्रॉफी जिंकतील. जर पाचव्या कसोटीत इंग्लंडने विजय मिळवला तर ही मालिका २-२ अशी बरोबरीत राहील.