फ्लोरिडा : मॅक्सिमिलिआनो अरौहो, डार्विन नुनेझ आणि मतायस व्हिएना यांनी नोंदवलेल्या गोलच्या जोरावर उरुग्वेने कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेत विजयी सलामी दिली. उरुग्वेने पनामाचा ३-१ असा पराभव केला.
तब्बल १५वेळा या स्पर्धेचे विजेतेपद मिळवणाऱ्या उरुग्वे संघाला प्रशिक्षक मार्सेलो बिएल्सा यांच्या अरौजोला सुरुवातीपासून खेळविण्याच्या निर्णयाचा फायदा झाला. अरौजोने सामन्याच्या १६व्या मिनिटाला गोलकक्षाच्या रेषेवरून चेंडूला अचूक गोलजाळीची दिशा दिली. पनामाने उत्तरार्धात आपला खेळ कमालीचा उंचावला होता. गोल करण्याच्या अनेक संधी निर्माण करुनही त्यांनी प्रत्येक संधी दवडली. त्यामुळे सामन्यात आव्हान राखण्याचे त्यांचे सारे प्रयत्न फसले. सामन्याच्या ५२व्या मिनिटाला जोस फायार्डोचा फटका दूरवरून बाहेर गेला. लांबवरुन गोल करण्याचा जोसे रॉड्रिगेजचा प्रयत्न उरुग्वेचा गोलरक्षक सर्गिओ रॉचेटने शिताफीने परतवून लावला.
हेही वाचा >>> IND v AUS: “आम्ही ऑस्ट्रेलियाला ओळखून आहोत…” भारताच्या विजयानंतर रोहित शर्माचं मोठं वक्तव्य, म्हणाला “आम्हाला जे करायचं होतं”
उत्तरार्धात सामन्याच्या ८५व्या मिनिटाला नुनेझने आलेला पास सुरेख घेत चेंडूला गोलजाळीची दिशा दिली. यापूर्वी नुनेझचा असाच एक प्रयत्न अपयशी ठरला होता. त्यानंतर भरपाई वेळेत दोन्ही संघांकडून वेगवान खेळ झाला. यामध्ये व्हिएनाने सेट पीसवर ९१व्या मिनिटाला उरुग्वेची आघाडी भक्कम केली. सामन्याच्या ९४व्या मिनिटाला पनामाच्या मायकेल मुरिलोने गोल केला, पण तोवर उशीर झाला होता.
अमेरिकेची बोलिव्हियावर मात
अर्लिंगटन : पूर्वार्धाच्या सुरुवातीला आणि अखेरीस गोल करून यजमान अमेरिकेच्या संघाने कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेत विजयी सलामी दिली. अमेरिकेने बोलिव्हियावर २-० अशी मात केली. सामन्याच्या तिसऱ्याच मिनिटाला कर्णधार ख्रिास्तियन पुलिसिचने गोल करत अमेरिकेला आघाडी मिळवून दिली. मग ४४व्या मिनिटाला फ्लोरियन बालोगनने अमेरिकाचा दुसरा गोल केला. उत्तरार्धात मात्र त्यांना गोलसंख्येत वाढ करता आली नाही.
अमेरिकेने सुरुवातीपासून आक्रमक खेळ करून प्रतिस्पर्ध्यांवर दडपण ठेवले होते. २०व्या सेकंदालाच बालोगनची गोल करण्याची संधी हुकली. मात्र, ही निराशा पुलिसिचच्या गोलने भरुन काढली. पुलिसिचने गोलकक्षाच्या कडेवरून चेंडूला जोरात किक दिली. बोलिव्हियाचा गोलरक्षक गुलेर्मो व्हिस्काराकडे चेंडू गोलजाळीत जाताना पाहण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. पुलिसिचचा हा बोलिव्हियाविरुद्ध पहिलाच गोल ठरला. त्यानंतर मध्यंतराला एक मिनिट शिल्लक असताना पुलिसिचच्या पासवर बालोगनने अमेरिकेची आघाडी दुप्पट केली. बालोगनचा हा सहा सामन्यांत पहिला गोल ठरला. त्यानंतर ६५व्या मिनिटाला राखीव खेळाडू म्हणून उतरलेल्या रिकार्डो पेपीने गोल करण्याचा केलेला प्रयत्न बोलिव्हियाचा गोलरक्षक व्हिस्काराने हाणून पाडला.