विश्वचषक स्पध्रेतील गाजलेल्या ‘चाव्या’प्रकरणी लुइस सुआरेझला बंदी घालणाऱ्या फिफा संघटनेच्या प्रमुखांवर उरुग्वेचे राष्ट्राध्यक्ष जोस मुजिका यांनी शिव्यांची लाखोली वाहिली. इटलीचा बचावपटू जॉर्जिओ चिएलिनीच्या खांद्याला चावा घेतल्याप्रकरणी सुआरेझवर चार महिन्यांसाठी बंदी घालण्यात आली आहे.
टीव्हीवरील एका क्रीडाविषयक कार्यक्रमात सुआरेझबाबत मुजिक यांनी आपले मत व्यक्त केले. रविवारी सुआरेझ जेव्हा उरुग्वेला परतला तेव्हा देशवासीयांनी त्याचे स्वागत केले. मुजिका यांनी फिफावर ताशेरे ओढताना जोरदार अपशब्द वापरले. आपली प्रतिक्रिया आम्ही प्रसारित करू का, असा प्रश्न जेव्हा पत्रकाराने विचारला तेव्हा मुजिका यांनी आपली कोणतीही हरकत नसल्याचे सांगितले. मुजिका यांच्या पत्नी ल्युसिया तोपोलांस्की यांनीही त्यांच्या भूमिकेचे समर्थन केले.
एका आकाशवाणी वाहिनीला मुलाखत देतानाही मुजिका म्हणाले होते की, ‘‘सुआरेझला दिलेली शिक्षा ही फिफा विश्वचषक फुटबॉल स्पध्रेच्या इतिहासातील सर्वात अपमानास्पद गोष्ट आहे.’’