गतविजेता अँडी मरे, पाचवा मानांकित टॉमस बर्डीच यांनी अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत अपराजित्व कायम राखले. महिलांमध्ये गतविजेत्या सेरेना विल्यम्स व ली ना यांनी आव्हान कायम राखले.
विम्बल्डन स्पर्धेत ७६ वर्षांनी इंग्लंडला विजेतेपद मिळवून देणाऱ्या मरे याने फ्लोरियन मेयर याच्यावर ७-६ (७-२), ६-२, ६-२ अशी सरळ तीन सेट्समध्ये मात केली. त्याने हा सामना जिंकताना सात बिनतोड सव्‍‌र्हिसबरोबर ४२ अचूक फटक्यांचाही उपयोग केला. त्याला उजबेकिस्तानच्या डेनिस इस्तोमिन याच्या आव्हानास सामोरे जावे लागणार आहे. इस्तोमिन याने २० वा मानांकित खेळाडू आंद्रेस सेप्पी याच्यावर ६-३, ६-४, २-६, ३-६, ६-१ असा रोमहर्षक विजय मिळविला. इस्तोमिन हा प्रथमच या स्पर्धेच्या उपउपांत्यपूर्व फेरीत खेळणार आहे.
लिटन ह्य़ुईट या २००१ च्या विजेत्या खेळाडूने रशियाच्या एवगेनी डोनोस्की याच्यावर ६-३, ७-६ (७-५), ६-१ असा विजय मिळविला. चेक प्रजासत्ताकच्या बर्डीच याने आव्हान राखताना फ्रान्सच्या ज्युलियन बेनेटिऊ याचा ६-०, ६-३, ६-२ असा धुव्वा उडविला. नवव्या मानांकित स्टानिस्लास वॉवरिंक याने सायप्रसच्या माकरेस बघदातीस याचा ६-३, ६-२, ६-७ (१-७), ७-६ (९-७) असा संघर्षपूर्ण लढतीनंतर पराभव केला.
सेरेना हिने पंधराव्या मानांकित स्लोएनी स्टीफन्स हिच्यावर मात करीत ऑस्ट्रेलियन स्पर्धेतील पराभवाची परतफेड केली. हा सामना तिने ६-४, ६-१ असा सरळ सेट्समध्ये जिंकला. तिला उपांत्यपूर्व फेरीत स्पेनच्या कार्ला नाव्हारो हिच्याशी खेळावे लागणार आहे. कार्ला हिने जर्मनीच्या अँजेलीक केर्बर हिच्यावर ४-६, ६-३, ७-६ (७-३) असा आश्चर्यजनक विजय नोंदविला. केर्बर हिला आठवे मानांकन देण्यात आले होते. ली ना हिने नववी मानांकित खेळाडू येलेना यांकोवीच हिच्यावर ६-३, ६-० असा विजय नोंदविताना फ्रेंच स्पर्धेतील पराभवाची परतफेड केली. रशियाच्या एकतेरिना माकारोवा हिने तृतीय मानांकित अ‍ॅग्नीझेका राडवानस्का हिची घोडदौड ६-४, ६-४ अशी सरळ दोन सेट्समध्ये रोखली.

रोहन बोपण्णाचे आव्हान संपुष्टात
भारताच्या रोहन बोपण्णा याचे अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेतील आव्हान येथे संपुष्टात आले. त्याने फ्रान्सचा टेनिसपटू एडवर्ड रॉजर व्हॅसेलीन याच्या साथीत दुहेरीत भाग घेतला होता. इंग्लंडच्या कॉलीन फ्लेमिंग व जोनाथन मरे यांनी त्यांच्यावर ६-४, ६-४ अशी मात केली. बोपण्णा व व्हॅसेलीन यांना सहा वेळा सव्‍‌र्हिसब्रेकची संधी मिळाली होती. मात्र त्याचा त्यांना फायदा घेता आला नाही.

Story img Loader