दहाव्या ग्रँड स्लॅम जेतेपदाला गवसणी
संपूर्ण स्पर्धेत एकही सेट न गमावता, उष्माघाती वातावरणात सर्बसारखा अनोखा फटका अंगीकारत ३३ वर्षीय रॉजर फेडरर अमेरिकन खुल्या स्पर्धेच्या अंतिम फेरीत दाखल झाला. पावसामुळे उशिरा सुरू झालेल्या लढतीत, चाहत्यांच्या प्रचंड पाठिंब्यासमोर तीन वर्षांचा ग्रँड स्लॅम जेतेपदांचा दुष्काळ संपवण्यासाठी फेडरर आतूर होता. मात्र कठोर व्यावसायिकता अंगी बाणवलेल्या जोकोव्हिचने फेडररला अवाक करत कारकीर्दीतील दहाव्या ग्रँड स्लॅम तर अमेरिकन खुल्या स्पर्धेच्या दुसऱ्या जेतेपदावर नाव कोरले.
जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी आणि अव्वल मानांकित जोकोव्हिचने फेडररवर ६-४, ५-७, ६-४, ६-४ असा विजय मिळवला. शैलीदार खेळ, ग्रँड स्लॅम स्पर्धाच्या अंतिम फेरीत खेळण्याचा प्रदीर्घ अनुभव आणि अंतिम फेरीपर्यंत केलेली अद्भुत वाटचाल यामुळे जेतेपदासाठी फेडररचे पारडे जड मानले जात होते. जोकोव्हिचचही लौकिकाला साजेसा खेळ करू शकला नाही. मात्र फेडररच्या स्वैर खेळाचा अचूक फायदा उठवत जोकोव्हिचने बाजी मारली.
वर्षांतील चार ग्रँड स्लॅम मिळून जोकोव्हिचची कामगिरी २७ विजय आणि एकमेव हार अशी विलक्षण आहे. अमेरिकन खुल्या स्पर्धेच्या अंतिम फेरीत आगेकूच केल्यानंतर वर्षांतील चारही ग्रँड स्लॅम स्पर्धाच्या अंतिम फेरीत खेळण्याचा विक्रम जोकोव्हिचने नावावर केला. जेतेपदासह जोकोव्हिचने फेडररविरुद्धची कामगिरी २१-२१ अशी सुधारली. या जेतेपदासह सर्वाधिक ग्रँड स्लॅम जेतेपदांचे मानकरी ठरलेल्या पुरुष टेनिसपटूंच्या यादीत जोकोव्हिचने महत्त्वपूर्ण झेप घेतली.
फेडररची सव्र्हिस भेदण्यात जोकोव्हिच सहावेळा सफल ठरला. २३ ब्रेकपॉइंट्सपैकी १९ वाचवत जोकोव्हिचने चतुराईने सरशी साधली. दुसरीकडे ५४ टाळत्या येण्यासारख्या चुका आणि २३ ब्रेकपॉइंट्सपैकी केवळ चारचे गुणात रुपांतर होणे फेडररच्या पराभवाचे कारण ठरले.
पहिल्या सेटमध्ये फेडररवर तीन ब्रेकपॉइंट वाचवण्याची वेळ ओढवली. जोकोव्हिचने २-१ आणि त्यानंतर ४-३ अशी आघाडी मिळवली. या आघाडीच्या बळावर आगेकूच करत जोकोव्हिचने पहिला सेट जिंकला. दुसऱ्या सेटमध्ये प्रत्येक गुणासाठी जोरदार मुकाबला रंगला. १५ मिनिटे रंगलेल्या मॅरेथॉन रॅलीद्वारे जोकोव्हिचने ५-५ अशी बरोबरी केली. क्रॉसकोर्टच्या अफलातून फटक्याच्या बळावर फेडररने दुसरा सेट नावावर केला. तिसऱ्या सेटमध्ये जोकोव्हिचने ५-२ अशी भक्कम आघाडी घेतली. फेडररच्या सर्बच्या फटक्याला लॉबच्या फटक्याने प्रत्युत्तर देत जोकोव्हिचने बाजी मारली. चौथ्या सेटमध्येही जोकोव्हिचने आघाडी मिळवली परंतु फेडररने संघर्ष करत ४-५ अशी पिछाडी भरून काढली. फेडररला तीन ब्रेकपॉइंटसची संधी मिळाली. मात्र फेडररचा फोरहँडचा चुकला आणि जोकोव्हिचने विजयी आरोळी ठोकली.
अमेरिकन खुली टेनिस स्पर्धा
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा