उत्कंठावर्धक झालेल्या सामन्यात सर्बियाच्या नोव्हाक जोकोविचने स्वित्झर्लंडच्या रॉजर फेडररचा पराभव करीत अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेतील पुरूष एकेरीचे विजेतेपद रविवारी पटकावले. जोकोविचने फेडररचा ६-४, ५-७, ६-४, ६-४ असा पराभव केला.
या वर्षातील फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेतील विजेतेपद वगळता जोकोविच अन्य तीनही ग्रॅंडस्लॅम विजेतेपद मिळवण्यात यशस्वी ठरला आहे. फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेमध्ये स्टॅन वावरिंकाने जोकोविचचा अंतिम सामन्यात पराभव केला होता. अमेरिकेन ओपन टेनिस स्पर्धेतील जोकोविचचे हे दुसरे ग्रॅंडस्लॅम आहे. आतापर्यंत त्याने दहा ग्रॅंडस्लॅम विजेतेपद मिळवली आहेत.
पावसामुळे रविवारी सुमारे तीन तास खेळ उशीराने सुरू झाला. त्यातच जोकोविच आणि फेडरर दोघांना सूर गवसण्यास थोडा जास्तच वेळ लागला. यामध्ये सुरुवातीच्या सेटमध्ये जोकोविच कोर्टवर पडल्यामुळे त्याच्या हाताला आणि पायाला किंचित दुखापतही झाली. मात्र, त्यानंतर त्याने खेळावर पूर्णपणे लक्ष केंद्रित करीत विजेतेपद संपादन केले.
फेडररने स्टॅन वावरिंकाचा पराभव करीत अमेरिकन ओपनच्या अंतिम फेरीत प्रवेश केला होता. जोकोविचने गतविजेत्या मरिन चिलीच याच्यावर विजय मिळवत अंतिम फेरीत प्रवेश केला होता.

Story img Loader