न्यूयॉर्क : ऑस्ट्रेलियाच्या निक किरयॉसने सोमवारी अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेतील सर्वात धक्कादायक निकालाची नोंद केली. किरियॉसने गतविजेता आणि अग्रमानांकित डॅनिल मेदवेदेवला पराभूत करून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. तसेच महिलांमध्ये अमेरिकेची युवा खेळाडू कोको गॉफला प्रथमच या स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठण्यात यश आले.

पुरुष एकेरीच्या रंगतदार सामन्यात विम्बल्डन स्पर्धेतील उपविजेत्या किरियॉसने मेदवेदेवचे आव्हान ७-६ (१३-११), ३-६, ६-३, ६-२ असे परतवून लावले. नोव्हाक जोकोव्हिचच्या अनुपस्थितीत जेतेपदासाठी प्रबळ दावेदार असलेल्या मेदवेदेवला या सामन्यात सर्वोत्तम खेळ करता आली नाही. दुसरीकडे अचूकता आणि तंदुरुस्तीवर अधिक भर देणाऱ्या किरियॉसने या लढतीत बाजी मारली.

उपांत्यपूर्व फेरीत किरियॉसची २७ व्या मानांकित कारेन खाचानोवशी गाठ पडेल. खाचानोवने स्पेनच्या पाब्लो कॅरेनो बुस्टाचा ४-६, ६-३, ६-१, ४-६, ६-३ असा पराभव केला.

महिला एकेरीत १८ वर्षीय कोको गॉफने उपउपांत्यपूर्व फेरीत चीनच्या झँग शुएईचे आव्हान ७-५, ७-५ असे परतवून लावले. १२व्या मानांकित गॉफची आता फ्रान्सच्या कॅरोलिना गार्सियाशी गाठ पडेल. गार्सियाने अ‍ॅलिसन रिस्के-अमृतराजला ६-४, ६-१ असे नमवले. सेरेना विल्यम्सचे आव्हान संपुष्टात आणणाऱ्या आयला टॉमयानोविचने ल्युडमिला सॅमोसनोवाचा ७-६(१०-८), ६-१ असा पराभव केला. टय़ुनिशियाच्या ओन्स जाबेऊरने १८व्या मानांकित व्हेरोनिका कुडेरमेटोवाला ७-६ (७-१), ६-४ असे पराभूत केले.

Story img Loader