न्यूयॉर्क : जागतिक क्रमवारीत अग्रस्थानी असलेला कार्लोस अल्कराझ आणि रशियाचा तिसरा मानांकित डॅनिल मेदवेदेव या जेतेपदासाठीच्या दावेदारांनी अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेतील पुरुष एकेरीच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. महिलांमध्ये अरिना सबालेन्का व अमेरिकेची मॅडिसन कीजनेही अंतिम चार खेळाडूंतील आपले स्थान निश्चित केले.
गतविजेत्या अल्कराझने जर्मनीच्या १२व्या मानांकित अॅलेक्झांडर झ्वेरेव्हला ६-३, ६-२, ६-४ असे पराभूत केले. या विजयामुळे अमेरिकन स्पर्धेत सलग दुसरे जेतेपद मिळवण्याच्या तो जवळ पोहोचला आहे. सामन्याच्या सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ करणाऱ्या अल्कराझने झ्वेरेव्हला पुनरागमनाची संधी दिली नाही. उपांत्य फेरीत अल्कराझची मेदवेदेवशी गाठ पडेल.
हेही वाचा >>> मेसी, हालँडचा समावेश; रोनाल्डोला वगळले; फुटबॉलविश्वातील प्रतिष्ठेच्या बॅलन डी’ओर पुरस्काराची नामांकन यादी जाहीर
मेदवेदेवने आपल्याच देशाच्या आंद्रे रुब्लेव्हला पराभूत करत चौथ्यांदा स्पर्धेची उपांत्य फेरीत गाठली. या सामन्यादरम्यान तापमान ३५ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचल्याने दोन्ही खेळाडूंना आव्हानाचा सामना करावा लागला. मेदवेदेवला सामन्यादरम्यान चिकित्सकाची मदतही घ्यावी लागली. तरीही त्याने रूब्लेव्हला ६-४, ६-३, ६-४ असे सरळ सेटमध्ये नमवले. पुरुष एकेरीच्या अन्य उपांत्य सामन्यात नोव्हाक जोकोविचपुढे अमेरिकेच्या बेन शेल्टनचे आव्हान असेल. शेल्टन प्रथमच ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या उपांत्य फेरीत खेळणार आहे.
हेही वाचा >>> IND vs PAK: पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यापूर्वी टीम इंडियाने केला इनडोअर सराव, के.एल. राहुलने गाळला घाम, पाहा फोटो
महिला एकेरीच्या उपांत्यपूर्व सामन्यात सबालेन्काने चीनच्या २३व्या मानांकित झेंग किनवेनला ६-१, ६-४ अशा फरकाने नमवत सलग पाचव्यांदा उपांत्य फेरीत प्रवेश मिळवला. दुसरी मानांकित सबालेन्का पुढील आठवडय़ात ‘डब्ल्यूटीए’ क्रमवारीत इगा श्वीऑनटेकला मागे टाकून जागतिक क्रमवारीत अग्रस्थानी पोहोचेल. उपांत्य फेरीत सबालेन्काचा सामना कीजशी होणार आहे. कीजने विम्बल्डन विजेत्या मार्केटा वोंड्रोउसोव्हावर ६-१, ६-४ असा विजय नोंदवला. महिला गटातील अन्य उपांत्य सामन्यात सहाव्या मानांकित कोको गॉफसमोर १०व्या मानांकित कॅरोलिना मुचोव्हाचे आव्हान असेल.
मेदवेदेवकडून आयोजकांवर टीकास्त्र
मेदवेदेवने उपांत्य फेरी गाठली असली, तरी सामन्यादरम्यान त्याला उकाडय़ाचा त्रास झाला आणि त्याने खेळाडूंना कठीण परिस्थितीचा सामना करावा लागत असल्याचे आयोजकांना सांगितले. ‘‘अशा परिस्थितीत खेळण्याची तुम्ही कल्पनाही करू शकत नाही. खेळाडूंना जीवही गमवावा लागू शकतो. आम्ही अशा स्थितीत काय करू शकतो, हे मला माहीत नाही. याबाबत आयोजकांनी विचार केला पाहिजे. खेळाडूंसाठी ही परिस्थिती कठीण आहे,’’ असे मेदवेदेव म्हणाला.
धोनीची उपस्थिती
भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत अल्कराझ व झ्वेरेव्ह यांच्यातील उपांत्यपूर्व फेरीचा सामना पाहण्यासाठी स्टेडियममध्ये उपस्थित होता. एका ध्वनिचित्रफितीत धोनी प्रेक्षकांमध्ये बसून खेळाचा आनंद घेताना दिसला.