एपी, न्यूयॉर्क

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अरिना सबालेन्काने अमेरिकेच्या जेसिका पेगुलाला सरळ सेटमध्ये पराभूत करत अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेच्या महिला एकेरीचे जेतेपद मिळवले. दुसऱ्या मानांकित सबालेन्काने अंतिम सामन्यात सहाव्या मानांकित पेगुलावर ७-५, ७-५ असा विजय मिळवला. सबालेन्काचे हे पहिलेच अमेरिकन टेनिस स्पर्धेचे जेतेपद आहे. तर, कारकीर्दीतील एकूण तिसरे विजेतेपद आहे.

सबालेन्काने गेल्या वर्षीही अमेरिकन टेनिस स्पर्धेची अंतिम फेरी गाठली होती. मात्र, तिला अमेरिकेच्या कोको गॉफकडून पराभवाचा सामना करावा लागला होता. तर, त्याआधी दोनदा तिचे आव्हान उपांत्य फेरीतच संपुष्टात आले. गॉफला स्थानिक चाहत्यांचा पाठिंबा होता. गॉफप्रमाणे पेगुलाही अमेरिकेची खेळाडू असल्याने तिला चाहत्यांचा पाठिंबा मिळणे अपेक्षित होते. मात्र, यावेळी सबालेन्काकडून त्यांना अपेक्षा होत्या. पेगुलाने प्रथमच ग्रँडस्लॅम स्पर्धेची अंतिम फेरी गाठली होती. त्यामुळे यंदाही जेतेपदाची माळ अमेरिकन खेळाडूच्या गळ्यात पडेल असे दिसत होते. मात्र, सबालेन्काने आपल्या खेळाने पेगुलावर वर्चस्व प्रस्थापित केले.

हेही वाचा >>> IND vs BAN : बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटीसाठी भारतीय संघ जाहीर! यश दयालसह ‘या’ खेळाडूंना मिळाली संधी

सामन्याच्या पहिल्या सेटमध्ये पेगुलाने आघाडी घेत चांगली सुरुवात केली. मात्र, पेगुलाला आपली ही आघाडी कायम राखता आली नाही. सबालेन्काने सलग पाच गेम जिंकत पहिला सेट जिंकला. दुसऱ्या सेटमध्ये सबालेन्काने आपली ही लय कायम राखताना ३-० अशी आघाडी घेतली.

यावेळी पेगुलाने पुनरागमन करत सबालेन्कासमोर आव्हान उपस्थित केले. मात्र, सबालेन्काच्या आक्रमक खेळासमोर पेगुलाचा निभाव लागला नाही. सबालेन्काने सेटसह सामना जिंकत जेतेपद पटकावले. सबालेन्काला गेल्या काही काळात अनेक अडचणींचा सामना करावा लागला आहे. तिच्या वडिलांचे २०१९मध्ये निधन झाले. खांद्याच्या दुखापतीमुळे तिला यावर्षी जुलैमध्ये विम्बल्डन स्पर्धेतून माघार घ्यावी लागली. जेतेपद मिळवल्यानंतर सबालेन्का म्हणाली,‘‘ गेले वर्ष मला खूप काही शिकवून गेले. अंतिम सामन्याच्या कठीण परिस्थितीत मी स्वत:ला भक्कम ठेवण्याचा प्रयत्न करत होती.’’

अरिना सबालेन्काचे वर्षातील दुसरे ग्रँडस्लॅम जेतेपद ठरले. यापूर्वी, तिने ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेचे विजेतेपद मिळवले होते.

 अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेचे जेतेपद मिळवताना अरिना सबालेन्काने आपल्या कारकीर्दीतील तिसऱ्या ग्रँडस्लॅम अजिंक्यपदाची नोंद केली.

जेव्हा मी चषकावर आपले नाव पाहते, तेव्हा मला स्वत:चाच अभिमान वाटतो. माझ्या कुटुंबासाठीही ही महत्त्वपूर्ण गोष्ट आहे. कारण, मला नेहमीच पुढे जाण्यासाठी त्यांनी प्रोत्साहन दिले. – अरिना सबालेन्का

सबालेन्काने निर्णायक क्षणी चांगली कामगिरी केली. मी पुनरागमन करताना स्वत:चे आव्हान कायम राखण्याचा प्रयत्न केला. मात्र, अखेरीस माझे प्रयत्न अपुरेच पडले. – जेसिका पेगुला

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Us open 2024 aryna sabalenka beats jessica pegula in final to win third grand slam title zws