न्यूयॉर्क : हंगामातील अखेरची ग्रँडस्लॅम स्पर्धा असणाऱ्या अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेच्या पहिल्या दिवशी मानांकित खेळाडूंनीच बाजी मारली. पुरुषांमध्ये दुसरा मानांकित नोव्हाक जोकोविच, तर महिलांमध्ये दुसरी मानांकित अरिना सबालेन्का आणि तिसरी मानांकित कोको गॉफ यांनी पहिल्या फेरीचा अडथळा सहजपणे पार केला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ऐतिहासिक २५वे ग्रँडस्लॅम विजेतेपद मिळवण्यासाठी उत्सुक असलेल्या जोकोविचने अमेरिकन स्पर्धेतील आपल्या मोहिमेस धडाक्यात सुरुवात केली. जोकोविचने पात्रता फेरीतून आलेल्या माल्दोवाच्या रॅडू अल्बोटचा ६-२, ६-२, ६-४ असा सहज पराभव केला. दोन अमेरिकन खेळाडूंमध्ये झालेल्या पहिल्या फेरीच्या लढतीत २०व्या मानांकित फ्रान्सिस टिआफोने अॅलेक्सांडर कावोसेविचला ६-४, ६-३, ४-६, ६-५ असे नमवले.

हेही वाचा >>> पॅरालिम्पिकमध्ये विदर्भाच्या ज्योतीचा सहभाग

महिला एकेरीत अमेरिकेच्या गतविजेत्या कोको गॉफने फ्रान्सच्या व्हरव्हरा ग्राशेवाचा ६६ मिनिटांत ६-२, ६-० असा फडशा पाडला.

जेतेपदासाठी प्रबळ दावेदार मानले जाणाऱ्या सबालेन्काने ऑस्ट्रेलियाच्या प्रिसिल्ला हॉनचा ६-३, ६-३ असा पराभव केला. एलिना स्विटोलिनाने मारिया लॉर्ड्रेस कार्लेला ३-६, ६-३, ६-४ असे पराभूत केले. ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्या चीनच्या झेंग क्विनवेनने आपली लय कायम राखताना अमांडा अॅनिसिमोवाचा ४-६, ६-४, ६-२ पराभव केला.

नागलचे आव्हान संपुष्टात

एकेरीतील भारताचा एकमेव खेळाडू असलेल्या सुमित नागलला पहिल्याच फेरीत पराभवाचा सामना करावा लागला. नेदरलँड्सच्या टॅलन ग्रिकस्पूरने सुमितचा ६-१, ६-३, ७-६ (८-६) असा सरळ सेटमध्ये पराभव केला. सुमितला पहिल्या दोन सेटमध्ये फारशी झुंज देता आली नाही. तिसऱ्या सेटमध्ये त्याने प्रतिकार केला, पण टायब्रेकरमध्ये तो पराभूत झाला.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Us open 2024 djokovic gauff and sabalenka sail into us open second round zws