Alexei Popyrin beat Novak Djokovic third round in US Open 2024 : यूएस ओपन २०२४ स्पर्धेतील सलग दुसऱ्या दिवशी चाहत्यांना रंगजदार लढत पाहायला मिळाली. कारण ३० ऑगस्ट रोजी कार्लोस अल्काराझ बाहेर पडल्यावर चाहत्यांना धक्का बसला होता. यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे ३१ ऑगस्ट रोजी स्टार टेनिसपटू नोव्हाक जोकोव्हिचला पराभवाचा धक्का बसला. त्याला तिसऱ्या फेरीत ऑस्ट्रेलियन खेळाडू २८व्या मानांकित ॲलेक्सी पोपिरिनविरुद्ध पराभवाला सामोरे जावे लागले. ज्यामुळे जोकोव्हिच १८ वर्षात पहिल्यांदाच यूएस ओपनच्या चौथ्या फेरीत पोहोचू शकला नाही. चार सेटच्या लढतीत जोकोव्हिचला ३-१ असा पराभव स्वीकारावा लागला.
२०१७ नंतर जोकोव्हिचला पहिल्यांदाच एकही ग्रँड स्लॅम जिंकण्यात अपयशी –
नोव्हाक जोकोव्हिचला २०१७ नंतर कारकिर्दीत प्रथमच कोणतेही ग्रँडस्लॅम जिंकण्यात यश मिळू शकले नाही. यूएस ओपनमध्ये १९७३ नंतर पहिल्यांदाच पुरुष एकेरीत दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकाचे खेळाडू चौथ्या फेरीपर्यंत पोहोचू शकले नाहीत. नोव्हाक जोकोव्हिचला ऑस्ट्रेलियन खेळाडू ॲलेक्सी पोपिरिनविरुद्ध पहिल्या दोन सेटमध्ये ४-६ आणि ४-६ असा पराभव स्वीकारावा लागला.
यानंतर, त्याने तिसऱ्या सेटमध्ये शानदार पुनरागमन केले आणि तो ६-२ ने जिंकला आणि आता पुढच्या सेटमध्ये जोकोव्हिचला सामना बरोबरीत सोडवेल, असे सर्वांना वाटत होते, परंतु अलेक्सी पोपिरिनने चौथा सेट ४-६ असा जिंकला यूएस ओपन २०२४ तिसऱ्या फेरीतच संपली. दोघांमधील हा सामना ३ तास १९ मिनिटे चालला.
हेही वाचा – IND vs AUS : ज्युनियर द्रविड टीम इंडियात; ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या U19 मालिकेसाठी झाली निवड
जोकोव्हिचने इतिहास घडवण्याची गमावली संधी –
टेनिसच्या जगात, नोव्हाक जोकोव्हिचने आतापर्यंत २४ ग्रँडस्लॅम आपल्या नावावर केले आहेत, ज्यामध्ये तो पुरुषांमध्ये सर्वाधिक वेळा जिंकणारा खेळाडू आहे. यूएस ओपन जिंकण्यात जोकोव्हिच यशस्वी झाला असता, तर तो पुरुष आणि महिला दोघांमध्ये सर्वाधिक २५ ग्रँडस्लॅम जिंकणारा टेनिस जगतातील खेळाडू बनला असता. सध्या, जोकोव्हिच २४ ग्रँड स्लॅम विजेतेपदांसह ऑस्ट्रेलियाच्या मार्गारेट कोर्टशी बरोबरीत आहे.
© IE Online Media Services (P) Ltd