एपी, न्यूयॉर्क
व्यावसायिक टेनिसपटू म्हणून यश मिळविल्यानंतर जोकोविचने अखेरीस पॅरिसमध्ये ऑलिम्पिक सुवर्णपदकाचेही स्वप्न साकार केले. आता या सोनेरी यशानंतर कारकीर्दीमधील २५व्या ग्रँडस्लॅम विजेतेपदाचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवत जोकोविच आजपासून अमेरिकन टेनिसच्या स्पर्धेत उतरेल.
सर्वाधिक आठवडे जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान, २४ ग्रँडस्लॅम विजेतीपदे, कारकीर्दीत एकूण ९९ विजेतीपदे आणि ऑलिम्पिकचे सुवर्णपदक मिळविल्यानंतरही जोकोविचची विजेतेपदाची भूक कमी झाली असे समजू नका. जोकोविचने हीच भावना अमेरिकन ओपन स्पर्धेच्या पूर्वसंध्येला बोलून दाखवली.
जोकोविच म्हणाला, ‘‘इतकी सारी विजेतीपदे आणि सुवर्णपदक मिळविल्यानंतरही तुझ्याकडे जिंकण्यासारखे अजून काय आहे असे लोक मला विचारतील. पण, माझ्यात अजूनही स्पर्धात्मक भावना आहे. मला अजून इतिहास घडवायचा आहे आणि व्यावसायिक टेनिस मालिकेचा आनंद घ्यायचा आहे.’’ जोकोविचच्या याच भावनेमुळे तो जेव्हा जेव्हा कोर्टवर उतरतो, तेव्हा त्याचा सहभाग हा मैलाचा दगड ठरतो. ऑर्थर अॅश या मुख्य कोर्टवर जोकोविचचा सामना मोल्डोवाच्या १३८व्या मानांकित रॅडू अल्बोटशी होईल. ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या २५व्या विजेतेपदापर्यंत अद्याप कुणी पुरुष किंवा महिला खेळाडू पोहोचलेली नाही. तिथपर्यंत जोकोविचला पोहोचायचे आहे.
हेही वाचा >>> PAK vs BAN : पाकिस्तानची बांगलादेशविरुद्धच्या लाजिरवाण्या पराभवानंतर क्रिकेट विश्वात फजिती! डब्ल्यूटीसी गुणतालिकेतही घसरण
फेडररने २००५ ते २००८ या दरम्यान सलग पाच वेळा ही स्पर्धा जिंकल्यानंतर कारकीर्दीत दुसऱ्यांदा सलग दोन वेळा ही स्पर्धा जिंकणारा खेळाडू बनण्याची जोकोविचला संधी आहे. ‘‘हा प्रवास इतका लांबचा असेल, असे माहीत नव्हते. विजेतेपदासाठी संघर्ष करणे मला नेहमीच आवडते आणि तेच माझे ध्येय असते. या वेळीही असेल,’’ असे ३७ वर्षीय जोकोविच म्हणाला.
कोको गॉफसमोर सबालेन्काचे आव्हान
कोको गॉफ या स्पर्धेत गतविजेती असली, या वेळी विजेतेपद टिकविण्यासाठी सर्वात आधी कोकोला स्वत:च्या खराब लयीच्या आव्हानाचा सामना करावा लागणार आहे. गतउपविजेती अरिना सबालेन्का तिच्या मार्गात अडथळा ठरू शकते. जागतिक क्रमवारीतील अग्रमानांकित इगा श्वीऑटेककडेही संभाव्य विजेती म्हणून बघितले जात आहे. उपांत्यपूर्व फेरीपर्यंतचा इगाचा मार्ग बराच सोपा आहे. जेसिका पेगुला देखिल आपल्या कामगिरीत सातत्य राखू शकल्यास तगड्या प्रतिस्पर्ध्यांसमोर आव्हान उभे करू शकेल. एलिना रायबाकिनाही चमकदार कामगिरी करण्यास सज्ज असेल.
देशासाठी सुवर्णपदक जिंकल्यानंतर सर्बियन राष्ट्रगीत पॅरिसमध्ये ऐकू आले. सर्बियन ध्वजासह गळ्यातील सुवर्णपदक हा अतिशय अभिमानाचा क्षण होता. टेनिस कोर्टवर मिळालेला हा सर्वोत्तम सन्मान मी मानतो. – नोव्हाक जोकोविच
●ऑलिम्पिक स्पर्धेदरम्यान उद्भवलेल्या घोट्याच्या दुखापतीतून कार्लोस अल्कराझही सज्ज झाला आहे. अमेरिकन स्पर्धेतील आव्हानाचा सामना करायला अल्कराझही उतरणार आहे. दुखापत बरी झाली असली, तरी अल्कराझ अद्याप शंभर टक्के तंदुरुस्त नाही. स्पर्धेदरम्यान पुन्हा त्रास होऊ नये, यासाठी अल्कराझला प्रशिक्षण आणि सरावाचा वेळ कमी करावा लागला.
●‘‘हंगामातील अखेरची स्पर्धा आहे. मला अधिक धोका पत्करायचा नव्हता. त्यामुळेच मी सरावाचा अवधी कमी केला,’’ असे अल्कराझ म्हणाला. अल्कराझने या वर्षी फ्रेंच टेनिस आणि विम्बल्डन स्पर्धा जिंकली आहे. अमेरिकन स्पर्धेत त्याची सलामीला ऑस्ट्रेलियाच्या ली तू याच्याशी गाठ पडणार आहे. दुसरीकडे अग्रमानांकित यानिक सिन्नेरकडेही सर्वांच्या नजरा लागून असतील.
●स्पर्धेपूर्वीच उत्तेजक सेवनात दोषी आढळल्यामुळे तो चर्चेत राहिला होता. सिनसिनाटी स्पर्धेतील विजेतेपदानंतर सिन्नेर उत्तेजक चाचणीत दोषी आढळल्यानंतरही त्याच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई झालेली नाही. त्यामुळे सिन्नेरच्याही कामगिरीकडे सर्वांच्या नजरा लागून असतील.