ग्रँडस्लॅम जेतेपद हा टेनिस विश्वाचा परमोच्च मानबिंदू. असंख्य खेळाडूंच्या भाऊगर्दीतून या स्पर्धेसाठी पात्र ठरत, प्रत्येक फेरीगणिक अव्वल खेळाडूंचे आव्हान मोडून काढत, शारीरिक तंदुरुस्ती आणि मानसिक कणखरतेची परीक्षा दिल्यानंतरच ग्रँडस्लॅम जेतेपद नावावर होते. आधुनिक महिला टेनिस दिग्गजांच्या मांदियाळीत स्थान पटकावलेल्या सेरेना विल्यम्सने कॅरोलिन वोझ्नियाकीवर मात करत अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेचे जेतेपद पटकावले. कारकिर्दीतले तब्बल अठराव्या जेतेपदाची कमाई करत सेरेनाने ‘अठरा विश्वे जेतेपद’ अशी नवी संकल्पनाच रुढ केली.

तिची प्रतिस्पर्धी कॅरोलिन वोझ्नियाकीला गेली दहा वर्षे आंतरराष्ट्रीय टेनिसमध्ये असूनही ग्रँडस्लॅम जेतेपद पटकावता आलेले नाही. मात्र सातत्य हाच ध्यास घेतलेल्या सेरेनाने दुखापती, वैयक्तिक आयुष्यातील अडचणी आणि दुखापती यांना न जुमानता आपला विजयरथ कायम राखला.

जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या अव्वल मानांकित सेरेनाने वोझ्नियाकीवर ६-३, ६-३ असा सरळ सेट्समध्ये विजय मिळवत अमेरिकन खुल्या स्पर्धेच्या सहाव्या जेतेपदावर कब्जा केला. वर्षांतल्या अन्य ग्रँडस्लॅम स्पर्धेत सेरेनाला जेतेपदापासून वंचित राहावे लागले होते. मात्र घरच्या मैदानावर जेतेपद पटकावण्याचा निश्चय करून आलेल्या सेरेनाने संपूर्ण स्पर्धेत सातत्यपूर्ण खेळ करत जेतेपद नावावर केले. या जेतेपदासह सेरेनाने सर्वाधिक ग्रँडस्लॅम जेतेपदांच्या यादीतील ख्रिस इव्हर्ट आणि मार्टिना नवरातिलोव्हा यांच्या अठरा जेतेपदांच्या विक्रमाची बरोबरी आहे. या यादीत २४ जेतेपदांसह मार्गारेट कोर्ट अव्वल तर २२ जेतेपदांसह स्टेफी ग्राफ दुसऱ्या स्थानी आहे.

पहिल्या सेटमध्ये सेरेनाने २-० अशी आघाडी घेतली. ताकदवान फोरहँड आणि तितकाच दमदार परतीच्या फटक्यांद्वारे सेरेनाने ही आघाडी ५-२ अशी वाढवली. वोझ्नियाकीच्या चुकांचा फायदा उठवत सेरेनाने पहिला सेट नावावर केला. सामन्यातले आव्हान जिवंत राखण्यासाठी वोझ्नियाकीला दुसरा सेट जिंकणे आवश्यक होते. मात्र याही सेटमध्ये सेरेनाने बाजी मारले. ड्रॉप, क्रॉसकोर्ट अशा शैलीदार फटक्यांच्या आधारे सेरेनाने दुसऱ्या सेटसह सामना जिंकला.

ख्रिस इव्हर्ट आणि मार्टिना नवरातिलोव्हा यांच्या ग्रँडस्लॅम जेतेपदांच्या विक्रमाची बरोबरी करेन असे कधीही वाटले नव्हते. या दिग्गज मांदियाळीत माझे नाव पाहणे स्वप्नवत आहे. एक स्वप्न आणि रॅकेट घेऊन मी खेळायला सुरुवात केली. तेव्हा मी इथपर्यंत मजल मारेन असे केव्हाही वाटले नव्हते. अठरावे जेतेपद अनोखे असे आहे कारण ख्रिस आणि मार्टिना यांनी एवढी जेतेपदे पटकावली आहेत. यंदाच्या तिन्ही ग्रँडस्लॅममध्ये मी अपयशी ठरले होते. मात्र या जेतेपदामुळे वर्षांचा शेवट गोड झाला आहे.

सेरेना विल्यम्स

Story img Loader