विजेतेपदासाठी उत्सुक असलेला नोव्हाक जोकोव्हिच व माजी विजेता रॉजर फेडरर यांनी अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत आगेकूच कायम राखली. मात्र माजी विजेती समंथा स्टोसूरला मात्र पराभवाचा धक्का बसला.
आतापर्यंत सहा ग्रँड स्लॅम विजेतेपद मिळविणाऱ्या जोकोव्हिचने लिथुवेनियाच्या रिकार्डस बेराकिन्सचा ६-१, ६-२, ६-२ असा धुव्वा उडविला. आतापर्यंत सतरा ग्रँड स्लॅम अजिंक्यपद मिळविणाऱ्या फेडरर याने स्लोवेनियाच्या ग्रेगा झेमलिजा याच्यावर ६-३, ६-२, ७-५ अशी मात केली. २०११मध्ये ही स्पर्धा जिंकणाऱ्या स्टोसूर हिला अमेरिकेची नवोदित खेळाडू व्हिक्टोरिया दुवाल हिने ५-७, ६-४, ६-४ असे चकित केले.
जोकोव्हिचने २०११मध्ये या स्पर्धेत अजिंक्यपद मिळविले होते. त्याने केवळ ८२ मिनिटांमध्ये बेराकिन्सला पराभूत केले. त्याने दहा बिनतोड सव्र्हिसेसचा उपयोग करीत आपल्या प्रतिस्पर्धी खेळाडूस फारशी संधी दिली नाही. जोकोव्हिचला आता जर्मनीच्या बेंजामिन बेकर याच्या आव्हानाला तोंड द्यावे लागणार आहे. गतवर्षी येथे त्याला अँडी मरे याच्याकडून हार स्वीकारावी लागली होती. विम्बल्डन स्पर्धेतही मरे याने अंतिम फेरीत जोकोव्हिचला हरवले होते. अमेरिकन स्पध्रेत मात्र जोकोवीच याने दिमाखदार प्रारंभ केला.
या स्पर्धेत सहावे विजेतेपद मिळविण्याच्या प्रतिक्षेत असलेल्या फेडरर याने झेमलिजाविरुद्ध सरळ तीन सेट्समध्ये विजय मिळविला. मात्र तिसऱ्या सेटमध्ये झेमलिजा याने चांगली लढत देत सामन्यात उत्सुकता निर्माण केली होती. हा सामना फेडरर याने दीड तासांत जिंकला. ३२ वर्षीय फेडरर याला यंदा सातवे मानांकन मिळाले आहे. त्याला आता अर्जेन्टिनाच्या कालरेस बेलॉर्क याच्याशी खेळावे लागणार आहे. त्याने २००४ ते २००८ या कालावधीत येथे सलग पाच वेळा अजिंक्य होण्याची किमया केली होती.
व्हिक्टोरिया अझारेन्काचा दणदणीत विजय
ऑस्ट्रेलियन स्पर्धा दोन वेळा जिंकणाऱ्या व्हिक्टोरिया अझारेन्का हिने जर्मनीच्या दिनाह अॅलेक्झांड्रा हिचा ६-०, ६-० असा धुव्वा उडविला. दुसऱ्या फेरीत द्वितीय मानांकित अझारेन्का हिला कॅनडाच्या अॅलेक्झांड्रा वोझ्नीयाकी हिच्याशी खेळावे लागणार आहे.
अमेरिकन खुली टेनिस स्पर्धा : जोकोव्हिच, फेडररची आगेकूच
विजेतेपदासाठी उत्सुक असलेला नोव्हाक जोकोव्हिच व माजी विजेता रॉजर फेडरर यांनी अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत आगेकूच कायम राखली.
First published on: 29-08-2013 at 04:59 IST
TOPICSयूएस ओपन
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Us open roger federer and novak djokovic dominate