भारताच्या सुमित नागलने अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत दमदार खेळ केला. स्टार टेनिसपटू रॉजर फेडरर याच्या विरोधात पहिल्यांदाच खेळताना त्याने फेडररला जोरदार टक्कर दिली. सुमितने फेडरर विरोधातील सामन्यात पहिलाच सेट होता. पण त्यानंतर मात्र त्याला सामना जिंकणे शक्य झाले नाही. सुमितने फेडररसारख्या बलाढ्य खेळाडूला विजयासाठी झुंजवले. त्यामुळे त्याची चांगलीच चर्चा रंगली. पण सामना सुरू असताना फेडरर एकाच वेगळ्याच गोष्टीमुळे चर्चेचा विषय ठरल्याचे दिसून आले.
सामना सुरू असताना दोन सेटच्या मध्ये खेळाडू पाणी पिण्याची विश्रांती घेतात. त्यावेळी ते बाजूला बसतात. त्याचप्रमाणे फेडररही पाणी पिण्यासाठी बाकावर बसला. त्याच्या पुढ्यात दोन बाटल्या पडलेल्या होत्या. त्यामुळे त्याने एक बाटली पाणी पिण्यासाठी उचलली आणि दुसरी बाटली खाली ठेवली. खाली ठेवलेली बाटली नीट न ठेवल्यामुळे पडली आणि घरंगळत फेडरर बसलेल्या बाकाच्या खालून मागच्या बाजूला गेली. फेडररला मात्र काही समजू शकले नाही. बाचली गेली तरी कुठे? अशाप्रकारचे भाव चेहऱ्यावर ठेवत फेडरर बाकाखाली वाकून बघू लागला. त्यानंतर त्याने टेनिसच्या रॅकेटने बाटली पुढे ओढण्याचा प्रयत्नदेखील केला, पण त्याला ते शक्य झाले नाही. अखेर तेथील बॉलबॉयने मागच्या बाजूला आलेली बाटली फेडररला उचलून आणून दिली. फेडररची झालेली फजिती पाहून काही काळ चाहत्यांमध्ये हशा पिकल्याचेही पहायला मिळाले.
Water bottle problems…
#USOpen pic.twitter.com/QjLiqOQYUy
— US Open Tennis (@usopen) August 27, 2019
दरम्यान, सुमितने त्याच्या अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेला स्वप्नवत सुरूवात केली होती. त्याने पहिल्याच सेटमध्ये टेनिसचा राजा असलेल्या फेडररला ६-४ असे पराभूत केले होते. पण त्यानंतर फेडररने आपला अनुभव पणाला लावत सामना ४-६, ६-१, ६-२, ६-४ असा जिंकला. त्याने पहिला सेट जिंकल्यानंतर साऱ्यांच्या भुवया उंचावल्या होत्या. फेडररसारख्या खेळाडूसोबत पहिल्याच सामन्यात पहिला सेट जिंकणे हे खूप मोठी बाब होती. त्यामुळे तो साऱ्यांच्याच चर्चेचा विषय बनला. पण फेडररने त्यानंतर आपला दमदार खेळ दाखवून दिला. त्याने दुसरा सेट ६-१ असा जिंकत जोरदार पुनरागमन केले. त्या सेटमध्ये सुमितला फारसा प्रतिकार करता आला नाही. तिसऱ्या सेटमध्येही फेडररने आपला जलवा दाखवत ६-२ असा सेट खि्शात घातला आणि सामन्यात आघाडी घेतली. पण चौथ्या सेटमध्ये मात्र सुमितने फेडररला पुन्हा निकराची झुंज दिली. फेडरर सहज विजय मिळवेल असे वाटत असताना सुमितने फेडररला चांगलेच झुंजवले. पण अखेर भारताच्या सुमितला पराभवाचा सामना करावा लागला.