वृत्तसंस्था, न्यूयॉर्क
प्रचंड उष्णता, हवेतील आद्र्रता आणि ताकदवान फटके मारणारी प्रतिस्पर्धी अशा आव्हानांवर मात करत अमेरिकेच्या १९ वर्षीय कोको गॉफने कारकीर्दीत प्रथमच अमेरिकन खुल्या ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली. पुरुष एकेरीतही अमेरिकेच्या २० वर्षीय बेन शेल्टनने अखेरच्या चार जणांत स्थान मिळवले आहे. नोव्हाक जोकोविचनेही विजयी घोडदौड कायम राखली आहे.
कोकोने उपांत्यपूर्व फेरीत जेलेना ओस्टापेन्कोचे आव्हान ६-०, ६-२ असे सहज संपुष्टात आणले. जागतिक स्तरावर आपली स्वतंत्र ओळख निर्माण करूनही कोकोला अद्याप मोठी स्पर्धा जिंकण्याचा अनुभव नाही. कोकोने प्रथमच आपल्या मायदेशातील ग्रँडस्लॅम स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली असली, तरी ती समाधानी नाही. ‘‘चाहत्यांबरोबर फोटो काढणे किंवा सह्या देणे हे माझे स्वप्न नाही. मला विजेतेपद मिळवायचे आहे आणि आता मी त्याच्या अगदी जवळ आले आहे,’’ असे कोकोने लढतीनंतर सांगितले. कमालीची उष्णता आणि हवामानात मोठय़ा प्रमाणावर असलेली आद्र्रता खेळाडूंच्या शारीरिक क्षमतेची कसोटी बघत होती. ओस्टापेन्कोचे फटके ताकदवान असतात. अशा प्रतिकूल परिस्थितीत कोकोने सहज विजय मिळवून आपल्या प्रगल्भतेची साक्ष दिली. उपांत्य फेरीत कोकोची गाठ १०व्या मानांकित चेक प्रजासत्ताकच्या कॅरोलिना मुचोवाशी पडणार आहे. मुचोवाने सोराना सिरस्टेआचा ६-०, ६-३ असा फडशा पाडला. पुरुष एकेरीतून २३ ग्रँडस्लॅम विजेत्या जोकोविचला आगेकूच कायम राखण्यात फारशी मेहनत घ्यावी लागली नाही. जोकोविचने नवव्या मानांकित टेलर फ्रिट्झचा ६-१, ६-४, ६-४ असा सहज पराभव केला. जोकोविचची गाठ बिगरमानांकित बेन शेल्टनशी पडणार आहे.
हेही वाचा >>>PAK vs BAN: इमाम-रिझवानची दमदार अर्धशतके! पाकिस्तानसमोर बांगलादेशची सपशेल शरणागती, तब्बल ७ विकेट्सने दणदणीत विजय
अमेरिकन खेळाडूंमधील लढत
बेन शेल्टननेही आपली स्वप्नवत घोडदौड कायम राखताना उपांत्य फेरी गाठली. कमालीच्या अचूक सव्र्हिसच्या यशावर शेल्टनने फ्रान्सिस टियाफोचा ६-२, ३-६, ७-६ (९-७), ६-२ असा पराभव केला. विशेष म्हणजे यजमान देशाच्या खेळाडूंमध्येच ही लढत झाली.
२ अमेरिकन खुल्या स्पर्धेत उपांत्य फेरी गाठणारी १९ वर्षीय कोको गॉफ अमेरिकेची दुसरी सर्वात युवा टेनिसपटू ठरली. यापूर्वी २००१ मध्ये सेरेना विल्यम्सने ही कामगिरी केली होती. कोकोचा हा गेल्या १७ सामन्यांतील १६वा विजय ठरला.