न्यूयॉर्क : सर्बियाचा तारांकित खेळाडू नोव्हाक जोकोव्हिचच्या अनुपस्थितीत सोमवारपासून सुरू होणाऱ्या अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत २२ ग्रँडस्लॅम विजेता राफेल नदाल आणि गतविजेता डॅनिल मेदवेदेव्ह यांच्या कामगिरीवर सर्वाचे लक्ष असेल. तसेच या स्पर्धेतील कामगिरीच्या बळावर पाच पुरुष खेळाडूंना जागतिक क्रमवारीत अग्रस्थानी पोहोचण्याची संधी आहे. यात नदालचाही समावेश आहे.
नदालने चार वेळा अमेरिकन स्पर्धेचे जेतेपद मिळवले आहे. परंतु २०१९ नंतर तो पहिल्यांदाच स्पर्धेत सहभाग नोंदवत आहे. त्याच्यासह जागतिक क्रमवारीत अग्रस्थानी असलेला मेदवेदेव्ह, स्पेनचा कार्लोस अल्कराझ, ग्रीसचा स्टेफानोस त्सित्सिपास आणि नॉर्वेचा कॅस्पर रुड यांना जेतेपदासाठी प्रबळ दावेदार मानले जात आहे.
महिला एकेरीत दोन वेळा विजेत्या नाओमी ओसाका आणि अग्रमानांकित इगा श्वीऑनटेकचे पारडे जड मानले जात आहे. पहिल्या फेरीत ओसाकाचा सामना डॅनिएले कोलिन्सशी होणार आहे. श्वीऑनटेकपुढे जॅस्मिन पावलिनीचे आव्हान असेल.
प्रशिक्षकांना सल्ला देता येणार!
यंदा पहिल्यांदाच ग्रँडस्लॅम स्पर्धेदरम्यान प्रशिक्षकांना सल्ला देता येणार आहे. त्यांना टेनिस कोर्टच्या जवळ एका ठिकाणी बसावे लागेल आणि तेथून ते खेळाडूंशी संवाद साधू शकतील.