USA Team Broke India Record: चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ ला सुरूवात झाली असून पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात पहिलाच अटीतटीचा सामना खेळवला जात आहे. तर भारतीय संघ बांगलादेशविरूद्ध आपल्या मोहिमेला सुरूवात करणार आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी ही आयसीसी स्पर्धा वनडे फॉरमॅटमध्ये खेळवली जात आहे. पण भारताच्या चॅम्पियन्स ट्रॉफीतील सामन्यापूर्वीच भारताचा विश्वविक्रम मोडित काढला आहे.

चॅम्पियन्स ट्रॉफीदरम्यान अमेरिकेच्या संघाने एकदिवसीय क्रिकेटमध्ये विश्वविक्रम केला आहे. अमेरिकेने मंगळवारी क्रिकेट वर्ल्ड लीग टू सामन्यात ओमानचा ५७ धावांनी पराभव करून पूर्ण ५० षटकात एका एकदिवसीय सामन्यात सर्वात कमी १२२ धावांचा बचाव करण्याचा विक्रम केला.

पुरुषांच्या एकदिवसीय सामन्यांमध्ये बचाव करण्यात आलेली ही सर्वात कमी धावसंख्या आहे. अमेरिकाने या सामन्यात फक्त १२२ धावा केल्या आणि अल अमिराती येथे झालेल्या ICC पुरुष क्रिकेट विश्वचषक लीग २ सामन्यात ओमान विरुद्ध ५७ धावांनी विजय मिळवला. ओमानचा संघ २५.३ षटकांत ६५ धावांत सर्वबाद झाला. संपूर्ण एकदिवसीय सामन्यात सर्वात कमी धावसंख्येचा यशस्वीपणे बचाव करण्याचा विक्रम भारताने १९८५ मध्ये केला होता. शारजाह येथे झालेल्या रोथमन्स फोर-नेशन्स कपमध्ये पाकिस्तानविरुद्ध १२५ धावा केल्या होत्या. त्यानंतर हा सामना ३८ धावांनी जिंकला.

अमेरिका विरुद्ध ओमान सामन्यात फिरकीपटूंचे वर्चस्व होते. संघातील सर्व नऊ गोलंदाज फिरकीपटू होते. आतापर्यंत खेळल्या गेलेल्या ४६७१ पूर्ण झालेल्या एकदिवसीय सामन्यांमध्ये ही पहिलीच वेळ आहे की कोणत्याही वेगवान गोलंदाजाने गोलंदाजी केली नाही. हा विशेष विक्रमही अमेरिकेच्या नावावर नोंदवला गेला आहे. अमेरिका आणि ओमानने ६१ षटकांत एकूण १८७ धावा केल्या. एकदिवसीय सामन्यातील दोन्ही संघांनी केलेली ही दुसरी सर्वात कमी धावसंख्या आहे. यापूर्वी २०१४ मध्ये भारत आणि बांगलादेशच्या संघाने एकूण १६३ धावा केल्या होत्या.

अमेरिका वि ओमानच्या या सामन्यात फिरकीपटूंनी एकूण १९ विकेट घेतल्या. एकदिवसीय सामन्यात फिरकीपटूंनी घेतलेल्या सर्वाधिक विकेट्सच्या विक्रमाची बरोबरी झाली. २०११ मध्ये बांगलादेश आणि पाकिस्तान यांच्यातील चितगाव येथे झालेल्या एकदिवसीय सामन्यात ही कामगिरी पाहायला मिळाली होती. अमेरिकेसाठीच्या या सामन्यात नॉथुश केंजिगेने कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी करत ११ धावांत ५ विकेट घेतले.

Story img Loader