पहिल्या सामन्यात जर्मनीकडून झालेला ४-० असा मानहानीकारक पराभव.. त्यामुळे वेशीवर टांगलेली अब्रू.. दुखापत आणि फॉर्मच्या चक्रव्यूहात अडकलेला अव्वल खेळाडू ख्रिस्तियानो रोनाल्डो.. पेपेला मिळालेले लाल कार्ड.. हे सारे दुर्दैवाचे दशावतारच.. पण हा सारा मनाचा दुबळेपणा झटकून टाकत पोर्तुगालचा संघ अमेरिकेविरुद्धच्या सामन्यासाठी सज्ज झाला आहे. अमेरिकेने पहिल्या सामन्यात घानावर विजय मिळवला होता, त्यामुळे त्यांनी हा सामना जिंकल्यास त्यांना बाद फेरीचे दार खुले होऊ शकते. आतापर्यंत विश्वचषकातमध्ये या दोन्ही संघात एकच सामना झाला असून तो सामना अमेरिकेने जिंकला आहे. त्यामुळे या सामन्यात अमेरिका विजय मिळवून विश्वचषकात आम्ही राजे असल्याचे दाखवणार की पोर्तुगाल विजयासह अमेरिकेचा सव्याज वचपा काढणार, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. पहिल्या सामन्यात पोर्तुगालला एकही गोल करता आला नव्हता, त्यामुळे या सामन्यात पोर्तुगाल गोल करून विजयाचे ध्येय सत्यात उतरवणार का, यावर साऱ्यांच्याच नजरा असतील.
गुडघ्याच्या दुखापतीने रोनाल्डो सध्या हैराण झालेला दिसत आहे. अमेरिकेच्या सामन्यापूर्वीही सराव करताना तो पूर्णपणे फिट असल्याचे दिसले नव्हते. त्यामुळे त्याच्या संघसहभागाबाबत काही प्रसारमाध्यमांनी चिंता व्यक्त केली असली तरी संघातील खेळाडूंनी रोनाल्डो फिट असल्याचे सांगत तो खेळणार असल्याचे स्पष्ट केले आहे. पोर्तुगालसाठी मोठी डोकेदुखी असेल ती पेपेला मिळालेल्या लाल कार्डाची. जर्मनीविरुद्धच्या सामन्यामध्ये पेपेला लाल कार्ड दिल्याने या सामन्यात तो खेळू शकणार नाही, त्यामुळे पोर्तुगालला या वेळी बचावावर अधिकाधिक भर द्यावा लागणार आहे.
पहिल्या सामन्यात विजय मिळवल्याने अमेरिकेचे मनोबल उंचावलेले असले तरी त्यांच्यासाठी पोर्तुगालचा सामना सोपा नसेल. पोर्तुगाल हा सामना जिंकेल, अशी फुटबॉल पंडितांनी भाकिते वर्तवली असून ती खरी ठरतात का, याचीच प्रतीक्षा साऱ्यांना असेल.
सामना क्र. ३०
‘ग’ गट : पोर्तुगाल वि. अमेरिका
स्थळ : अरेना अॅमाझोनिया, मनाऊस * वेळ : (२३ जून) पहाटे ३.३० वा.
लक्षवेधी खेळाडू
ख्रिस्तियानो रोनाल्डो (पोर्तुगाल) : पोर्तुगालसह साऱ्या क्रीडा विश्वाच्या नजरा आता ख्रिस्तियानो रोनाल्डोवर खिळलेल्या असतील. यावर्षीचा सर्वोत्तम फुटबॉलपटूचा पुरस्कार पटकावलेला रोनाल्डो जर्मनीविरुद्धच्या पहिल्या सामन्यात निष्प्रभ ठरला असला तरी त्याच्यासाठी फॉर्मात येण्यासाठी एक क्षण पुरेसा ठरू शकतो. त्यामुळे अमेरिकेविरुद्धच्या सामन्यात तो आनंददायी क्षण रोनाल्डो पोर्तुगालला देणार का, याकडेच साऱ्यांचे लक्ष असेल.
क्लिंट डेम्प्सी (अमेरिका) : अमेरिकेचा सर्वात नावाजलेला खेळाडू म्हणजे क्लिंट डेम्प्सी. अमेरिकेच्या संघात जो महत्त्वपूर्ण बदल पाहायला मिळाला, त्याचे एक कारण क्लिंट आहे. कारण जोरदार आक्रमण लगावण्याबरोबर मधली फळी सांभाळण्याची जबाबदारी तो चोख निभावतो. त्यामुळे पोर्तुगालवर आक्रमण करण्याची मुख्यत्वेकरून जबाबदारी क्लिंटवर असेल. आतापर्यंत त्याने आपल्या कामगिरीच्या जोरावर अमेरिकेला जिंकवून दिले आहे, त्याची हीच जादू पोर्तुगालविरुद्धच्या सामन्यातही पाहायला मिळू शकते.
गोलपोस्ट
ख्रिस्तियानो रोनाल्डो खेळणार की नाही याबाबत प्रसारमाध्यमांमध्ये चर्वितचर्वण सुरू आहे, पण माझ्या मते रोनाल्डोने याबाबत योग्य ते उत्तर दिलेले आहे. तो कसून सराव करत आहे. पहिला सामना गमावल्यामुळे आमच्या संघावर काहीसे दडपण असले तरी ते झुगारून आम्ही अमेरिकेविरुद्धच्या सामन्यासाठी सज्ज झालो आहेत. हा सामना जिंकून बाद फेरीच्या दिशेने आम्ही कूच करणार आहोत. – हेल्डर पोस्टिगा, पोर्तुगाल
पहिल्या सामन्यात संघाने चांगली कामगिरी केली होती. पोर्तुगालचा सामना आमच्यासाठी नक्कीच सोपा नसेल, पण या सामन्यासाठी आम्ही सज्ज आहोत. संघाचा चांगला सराव झाला आहे, त्याचबरोबर या सामन्यासाठी खास रणनीती आम्ही आखली आहे. पोर्तुगालला या सामन्यात आम्ही पराभूत करून बाद फेरीत पोहोचू शकतो, त्यामुळे या सामन्यातील विजय आमच्यासाठी महत्त्वाचा असेल. – जुर्गन क्लिन्समन, अमेरिका
आमने-सामने
सामना : १
विजय : अमेरिका १