आपल्यातील वेगाने सर्वाना अचंबित करणारा जमैकाचा धावपटू युसेन बोल्ट आता निवृत्तीचा गांभीर्याने विचार करू लागला आहे. २०१६ साली रिओ डी जानेरो येथे होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेनंतर आपण निवृत्त होणार असल्याचे बोल्टने सूतोवाच केले होते. पण तीन आठवडय़ानंतरच त्याने आपण आपली कारकीर्द एक वर्षांने वाढवणार असल्याचे घूमजाव त्याने केले आहे.
एक वर्षांने कारकीर्द लांबणीवर पडली, याचा अर्थ लंडनमध्ये २०१७मध्ये होणाऱ्या विश्व अजिंक्यपद शर्यतीनंतर बोल्ट निवृत्त होईल. ‘‘मी माझ्या कारकिर्दीचा पुनर्विचार करत आहे. निवृत्तीच्या घोषणेनंतर अनेक चाहत्यांनी मला विरोध केला. चाहते आणि पुरस्कर्त्यांच्या प्रेमासाठी मी आणखी एक वर्ष कारकीर्द लांबवण्याचा निर्णय घेतला आहे. प्रशिक्षकांशी चर्चा केल्यानंतर त्यांनीही हे शक्य असल्याचे सांगितले आहे. आता पुढे काय होतेय, हे येणारा काळच ठरवणार आहे,’’ असे बोल्टने सांगितले.
२०२० टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेचा मी विचार करत नसल्याचे बोल्ट म्हणाला. ‘‘२०२० ऑलिम्पिकला अद्याप बराच वेळ बाकी आहे. त्यामुळे मी २०१० ऑलिम्पिकचा फारसा विचार करत नाही. २०१६ ऑलिम्पिकमध्ये पदके जिंकण्यासाठी मी माझी सर्व शक्ती पणाला लावणार आहे. २०१४ ग्लास्गो राष्ट्रकुल स्पर्धेत सहभागी होण्याचे उद्दिष्ट मी ठेवले आहे. राष्ट्रकुल स्पर्धेत सहभागी व्हायला मला आवडेल, असे मी माझ्या प्रशिक्षकांना सांगितले आहे. आता माझ्या सहभागाचा निर्णय तेच घेतील,’’ असेही बोल्टने सांगितले. बोल्टने २००८ बीजिंग ऑलिम्पिकमध्ये १०० मीटर, २०० मीटर आणि ४ बाय १०० मीटर रिले शर्यतीत सुवर्णपदक पटकावण्याची करामत केली होती. २०१२ लंडन ऑलिम्पिकमध्येही त्याने हीच तीन सुवर्णपदके पटकावली होती.