जमैकाचा ऑलिम्पिक व विश्वविजेता धावपटू उसेन बोल्टने यंदा रिओ येथे होणाऱ्या ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेनंतर निवृत्त होण्याचे संकेत दिले आहेत. ही स्पर्धा आपल्या कारकीर्दीतील शेवटची ऑलिम्पिक स्पर्धा असेल, असे त्याने सांगितले.
बोल्टचे प्रशिक्षक ग्लेन मिल्स यांनी बोल्ट हा २०२०च्या ऑलिम्पिकमध्ये सहभागी होईल व तोपर्यंत त्याची शारीरिक तंदुरुस्ती राहील असे जाहीर केले होते. मात्र बोल्ट याने यंदाची ऑलिम्पिक स्पर्धा आपली अखेरचीच ऑलिम्पिक असेल व त्यामध्ये तीन सुवर्णपदके जिंकण्याचे आपले ध्येय असल्याचे सांगितले. आणखी तीन-चार वर्षे सर्वोत्तम स्तरावर तंदुरुस्ती व उत्साह टिकवणे खूप अवघड असल्याचे त्याने सांगितले. बोल्टने २००८ ते २०१२ या कालावधीत ऑलिम्पिकमध्ये सहा सुवर्णपदकांची कमाई केली आहे. लंडन येथे २०१७ मध्ये जागतिक अजिंक्यपद स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेनंतर बोल्ट निवृत्त होण्याची शक्यता आहे.
बोल्ट म्हणाला, ‘‘यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये तीन सुवर्णपदके जिंकण्यासाठी मी खूप मेहनत घेत आहे. २०० मीटर अंतराची शर्यत १९ सेकंदांपेक्षा कमी वेळेत पूर्ण करीत विश्वविक्रम करण्याचेही माझे ध्येय आहे. सध्या असलेला १९.१९ सेकंद हा विश्वविक्रम माझ्याच नावावर आहे. त्यापेक्षा कमी वेळेत हे अंतर पार करण्याचा मी सराव करीत आहे. आतापर्यंत मी जे बोललो आहे, तेच मी करून दाखविले आहे.

Story img Loader